राहुरीतील कारागृहाच्या खिडकीचे गज कापून पळालेला ‘ सोन्या ‘ इथे धरला

शेअर करा

नगर जिल्ह्यातील राहुरी येथे काही दिवसांपूर्वी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली होती. जिल्हा पोलिस दलाची देखील या प्रकरणानंतर चांगलीच नाचक्की झालेली पाहायला मिळाली होती. मात्र आता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीतील एका आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.

नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी ( वय 22 राहणार मोरे चिंचोली तालुका नेवासा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुरी येथून 18 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास कारागृहाच्या खिडकीचे गज कापून मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या पाच आरोपींनी पलायन केले होते. पलायन केले त्याच दिवशी सागर भांड, किरण अजबे आणि जालिंदर सगळगिळे या आरोपींना ताब्यात घेतले होते मात्र नितीन उर्फ सोन्या माळी आणि आणि रवि पोपट लोंढे हे फरार होण्यात यशस्वी झाले होते.

नितीन माळी याला पोलिसांनी जेरबंद केले असून आणखी एक आरोपी रवी लोंढे हा मात्र अद्याप फरार आहे. राहुरीच्या ब्रिटिशकालीन कारागृहातून कैदी फरार झाल्याची घटना घडल्यानंतर राहुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व घटनेच्या वेळी सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.


शेअर करा