महाराष्ट्रात नागपूर इथे एका धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शाळेच्या बसवरील महिला बस कंडक्टर दीपा दास यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती मात्र अखेर काही तासात या हत्येचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलेले असून पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. शम्मी सोनी आणि त्याची पत्नी सुवर्णा सोनी अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.
काय आहे प्रकरण ?
दीपा दास ( वय ४१ ) या वस्तीतील लोकांना व्याजावर पैसे उसनवारी म्हणून देत होत्या. कुशीनगर परिसरात राहणाऱ्या सोनी दाम्पत्यालाही त्यांनी काही रक्कम उसनवारीवर दिली होती मात्र परतफेड होत नसल्याने त्यांच्यात व्याजाच्या पैशांवरुन वाद सुरु होता. शनिवारी (26 मार्च) दुपारी शालेय बसवरील ड्युटी संपल्यानंतर दीपा दास कुशीनगर परिसरात सोनी दाम्पत्याच्या घरी त्याच पैशासंदर्भात गेल्या होत्या. तिथे त्यांचा सोनी दाम्पत्यासोबत वाद झाला.
वादाचे पर्यवसान मारामारीत झाले आणि सोनी दाम्पत्याने त्यांची गळा आवळून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनी दाम्पत्याने दीपा दास यांचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून उप्पलवाडी रोडवर नेऊन फेकला. शोध सुरु असतानाच रविवारी (27 मार्च) संध्याकाळी कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत उप्पलवाडी रोडवर प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला आणि त्यांची ओळख पटताच पोलिसांनी शोध सुरु केला आणि सोनी दाम्पत्यास जेरबंद केले.