गोवा हादरले..आईला संपवण्यासाठी प्रेयसीसोबत रात्रभर गच्चीवर मुक्काम अन ..

शेअर करा

अनेक मुलांसाठी आई म्हणजे सर्वस्व असते मात्र या घटनेत चक्क प्रेयसीच्या नादी लागून एका नराधमाने आपल्या आईचा खून केला आहे. दत्तक गेलेल्या मुलाने धारदार शस्त्राने आईचा खून केल्याची ही घटना गोवा येथील धडे सावर्डे येथे घडलेली असून सोमवारी दुपारी बारा वाजता घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश मंगलदास नाईक ( वय 18 ) असे संशयित मुलाचे नाव असून त्याने आपली आई मनिषा मंगलदास नाईक ( वय 55 ) यांचा प्रेयसीच्या मदतीने खून केलेला आहे. पोलिसांनी अवघ्या पाच तासात खुन्याचा शोध लावून संशयित आरोपीला प्रेयसीसह गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडे गावाच्या एका टोकाला मंगलदास नाईक यांचे घर आहे. पत्नी मनीषा आणि त्यांचा मुलगा प्रथमेश असे कुटुंब येथे राहत असून मंगलदास यांचा स्पेअर पार्टचा व्यवसाय आहे. त्यांना मूलबाळ होत नसल्याने त्यांनी प्रथमेश याला दत्तक घेतले होते मात्र काही दिवसांपासून प्रथमेश आणि त्याची आई आणि वडील यांच्यात कायम भांडणे होत होती. तो सातत्याने आई-वडिलांपासून दूर राहत होता आणि त्याचे पंचवाडी येथे एका मुलीवर त्याचे देखील प्रेम जडले होते. या प्रेमप्रकरणाला विरोध होत असल्याने तो घरातून निघून गेला होता आणि त्याच्या मावशीकडे राहत होता.

रविवारी 27 तारखेला प्रथमेश आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी घरी आले आणि गुपचूप घराच्या गच्चीवर दोघेही झोपी गेले. सोमवारी सकाळी मंगलदास आपल्या दुकानावर गेले असताना सकाळी दहाच्या सुमारास प्रथमेश आणि त्याची प्रेयसी गच्चीवरून खाली आले आणि आईसोबत भांडायला सुरुवात केली त्यावेळी प्रथमेशने आई मनीषा यांच्यावर लोखंडी सळी आणि चाकूने वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दुपारी बाराच्या सुमारास नाईक यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता मात्र नेहमीचे भांडण असावे अशा समजुतीने शेजार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुपारी एकच्या दरम्यान दुकान बंद करून मंगलदास घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. मनीषा या एकट्या घरात असल्याने त्यांनी पत्नीला हाक मारली मात्र दरवाजा उघडला नाही. पत्नी दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी आसपासच्या लोकांना बोलावले आणि त्यानंतर पोलिसांमध्ये खबर देण्यात आली. पोलिस आल्यावर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू देखील झाला होता. पोलिसांनी अवघ्या पाच तासात संशयित आरोपी प्रथमेश याला त्याच्या प्रेयसीसह अटक केली असून त्याने आईवर वार करून तिचा जीव घेतल्याची कबुली दिलेली आहे.


शेअर करा