पुण्यात खळबळ..हिंजवडीत झाडावर महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

शेअर करा

पुणे शहरानजीक एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका २० ते २३ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत उंबराच्या झाडावर आढळून आला आहे . हिंजवडीजवळील माण येथे मुळा नदीकाठी असलेल्या एका झाडावर हा प्रकार उघडकीस आलेला असून मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आहे . उंबराच्या झाडावर मृतदेह आढळून आल्याने घातपात आणि अंधश्रद्धा दोन्हीही अँगलवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत महिलेची ओळखच पटलेली नसल्याने पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा देखील सक्रिय केलेली आहे .

मयत महिलेचा मृतदेह इतका कुजलेला होता कि त्याचा वास परिसरात येऊ लागला आणि काही नागरिकांनी तेथे जाऊन पहिले असता झाडावर मृतदेह असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले.10 ते 15 फूट उंचीच्या फांदीवर हा महिलेचा मृतदेह असल्याने तिचा खून करून कोणीतरी हा मृतदेह झाडावर नेऊन टाकलेला असावा अशी शक्यता दिसून येत आहे. मृतदेह पूर्ण कुजलेला असून केवळ सांगाडा उरला आहे.

ज्या झाडावर हा मृतदेह ठेवण्यात आला ते झाड उंबराचे असल्याने हा घातपात नसून अंधश्रद्धेपोटी एखाद्या महिलेचा बळी दिला गेला असावा अशीही शक्यता वर्तवली जातेय. उंबराच्या झाडाखाली वेगवेगळ्या अघोरी पूजा केल्याचे अनेक प्रकार या आधी वेगवगेळ्या ठिकाणी समोर आले होते. त्यामुळे नेमका हा घातपात आहे की बळी ? याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

घटनेची माहिती समजताच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घटनास्थळी धाव घेतली असून झाडावर अथवा आजूबाजूला कोणतीही दोरी अथवा ओढणी नसल्याने हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याची शक्यता पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वर्तवली आहे. परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद आहे का ? याचाही तपास पोलिस करीत आहेत. हिंजवडी परिसरात आयटी कंपन्या अधिक आहेत आणि त्यामुळे परिसरात राहणाऱ्या अभियंत्याच्या संख्याही मोठी आहे. मागील काही महिन्यात हिंजवडी आणि परिसरातील किती महिला तरुणी बेपत्ता आहेत याची माहिती संकलित करून आधी त्या दृष्टीने तपास केला जाणार आहे.


शेअर करा