नगर ब्रेकिंग..लोकजागृती विरुद्ध राळेगणसिद्धी टँकर घोटाळ्यावरून आमने सामने

शेअर करा

संपूर्ण नगर जिल्ह्यात गाजलेल्या टँकर घोटाळ्याबाबत लोकजागृती संस्थेला आमच्या गावात अर्थात राळेगण-सिद्धी येथे उपोषण करता येणार नाही असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावच्या ग्रामपंचायतीने या संस्थेला दिले आहे. आमचे गाव चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालत नाही मात्र ग्रामसभेने काय करावे हे इतर कुणी सांगू शकत नाही, असे सरपंचांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नगर जिल्ह्यात 2019 साली टँकरच्या पाणीपुरवठ्यात अनियमितता आढळून आली होती त्यानंतर सदर पाणी पुरवठा करणाऱ्या या संस्थेच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि यात राळेगणसिद्धी गावातील काही पदाधिकारी असल्याने ग्रामपंचायतने यासंदर्भात भ्रष्टाचार प्रकरणी भूमिका घेऊन चौकशीची मागणी करावी तसेच ग्रामसभेत या विषयावर चर्चा करावी, असे आवाहन लोकजागृती संस्थेने केले आहे.

सदर मागणी बाबत आत्तापर्यंत अण्णा हजारे आणि ग्रामसभा यांनी काहीही भाष्य केले नाही त्यामुळे राळेगण सिद्धी गावात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यावर सरपंच लाभेश औटी यांनी आपली भूमिका मांडत ‘ एखाद्या प्रकरणात काय निर्णय घ्यावा हे इतर कोणी सांगू शकत नाही ते आमच्या अधिकारावर आक्रमण ठरेल. या प्रकरणात कुणी दोषी आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल मात्र त्यात त्याला वाचवण्याची गावाची भूमिका नाही मात्र लोकजागृती संस्था अण्णा हजारे आणि राळेगण सिद्धीला बदनाम करत आहे ,’ असे म्हटले आहे. ज्या ठेकेदार संस्थेबाबत तक्रारी आहेत त्यात इतर गावांचेही काही पदाधिकारी आहेत मग केवळ उपोषण राळेगणसिद्धी येथे कशासाठी ? राळेगणसिद्धीला लक्ष केल्यावर प्रसिद्धी मिळेल मात्र यातून गावाची बदनामी होईल म्हणून गावात उपोषण अथवा आंदोलनाला परवानगी देता येणार नाही असे म्हटले आहे

लोक जागृती प्रतिष्ठानचे सचिव रामदास घावटे यांनी याबद्दल आपली भूमिका मांडताना, ‘ राळेगण सिद्धीच्या सरपंचाचे पत्र आम्हाला मिळाले. राळेगणसिद्धी ग्रामपंचायत सर्व देशाला भ्रष्टाचार मुक्तीचे धडे देते त्यानंतर घोटाळ्याची पारदर्शी चौकशी व्हावी एवढी एक मागणी या ग्रामसभेने करायला काय हरकत आहे त्यातून प्रशासनावरील दडपण कमी होईल. उपोषणाचा मार्ग याच ग्रामसभेने आम्हाला दाखवलेला आहे. आम्ही कुठे उपोषण करावे हा आमचा हक्क आहे त्यामुळे आम्ही राळेगणसिद्धीत उपोषण करणार ‘, अशी भूमिका मांडलेली आहे.


शेअर करा