भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दरोड्यासारखी कलमे वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बीडमधील आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांनी आठ महिन्यापूर्वी फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात आता दरोड्या सारखी गंभीर कलमे वाढविण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत.
आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घराची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले अशी फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना भारतीय दंड संहितेच्या कलम 143 , 147 , 148 , 149 , 427 ,336 , आणि 379 ही कलमे लावली होती मात्र पुन्हा या कलमात खंडणीच्या कलमाची वाढ करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
सुरेश धस यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात आता नव्याने दरोडा 395 , बेकायदा घरात घुसणे 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 452 , यासह शांतता भंग करणे आणि इतर 341 ,504 ,506 ही कलमे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.