नगर शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदार संस्थेच्या टँकरवरील एका चालकाला दिल्लीगेट परिसरात एक जणाने अडवत ‘ आधी माझ्या घरी पाणी टाकायला चल ‘ असे म्हणत मारहाण करून शिवीगाळ केलेली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून आरोपीच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकर चालक असलेले भैरवनाथ बन्सी बोरकर ( राहणार वाळकी तालुका नगर ) यांनी संशयित आरोपी राजू वाडेकर ( राहणार आनंद पार्क कल्याण रोड ) याच्या विरोधात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, ‘ मी टँकर घेऊन जात असताना मंगळवारी सकाळी वाडेकर यांनी मला दिल्लीगेट जवळ मोटर सायकल आडवी लावत अडवले आणि माझ्या घरी पाणी टाकायला चल ‘ असे म्हणत त्याने दमदाटी केली.
सदर घटनेनंतर ठेकेदार असलेले दिपाली ट्रान्सपोर्ट यांच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून अशा पद्धतीने टँकर चालकांना होणारी मारहाण दुर्दैवी आहे. आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे .