
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली नाही म्हणून काही कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोकले आणि आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्या अंगावर काळा द्रवपदार्थ ओतत घोषणाबाजी केली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काही कार्यकर्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आले आणि कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार त्यांनी बंद केले आणि जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यातील एका ओळखीच्या व्यक्तीने बच्छाव यांना फोन करून बाहेर बोलावून घेतले.
नानासाहेब बच्छाव बाहेर आल्यानंतर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली नाही असा प्रश्न विचारण्यात आला आणि याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बच्छाव यांच्या अंगावर काळ्या रंगाचा द्रव पदार्थ टाकला. घडलेल्या या प्रकारानंतर अधिकारी गोंधळून गेले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जमा झाले आणि त्यांनी या घटनेच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारले. शहर पोलिस ठाण्यात या प्रकाराची खबर देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अधिकार्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल होणार हे लक्षात येताच प्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे .