‘ त्या ‘ युवकाच्या चाळ्यांनी भल्या पहाटे औरंगाबादकरांना फोडला घाम

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना औरंगाबाद येथे समोर आलेली असून गुरुप्रसाद नगर येथील विजेच्या ट्रांसफार्मरच्या कठड्यावर एक अर्धनग्न अवस्थेत युवक जीव देण्यासाठी पोचला होता. मुकुंदवाडी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासांच्या थरारानंतर या युवकाला उतरवण्यास पोलिसांना यश आले.

सदर युवक हा ट्रान्सफॉर्मरवर चढून बसण्याचे कारण देखील तितकेच वेगळे आहे. युवकाने म्हटले आहे की ‘ हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलो होतो त्यावेळी मित्रांनी मला तलवारीने मारहाण केली मात्र सोडवायला कोणी आलेले नाही. जोपर्यंत त्या मित्राला बोलवत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही. विजेच्या तारेला धरून जीव देणार आहे,’ असे देखील तो पोलिसांना सांगत होता.

पोलिस निरीक्षक असलेले ब्रम्हा गिरी यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला मात्र पहाटे साडेतीनची वेळ असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून देखील व्यवस्थित प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे मुळे बरीच फोनाफोनी करत वीज प्रवाह बंद केला मात्र तरी देखील अर्थिंगच्या विजेचा धोका असल्याने त्या युवकाला बोलण्यात गुंतवून पकडण्यात आले.

जवळून गेलेल्या एखाद्या तारेला जरी त्याने पकडले असते तरी त्याचा जीव गेला असता मात्र मुकुंदवाडी पोलिसांमुळे त्याचे प्राण वाचले आहे. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर , अंमलदार सुहास मुंडे, संदीप वैद्य, रवींद्र भेंडे यांच्या पथकाने केली आहे. विद्युत प्रवाह बंद केला गेल्यामुळे अचानकपणे घरातील पंखे कुलर आणि एसी बंद झाले आणि नागरिक देखील घामाघुम झाले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना हा काय प्रकार आहे हे लक्षात आले.


शेअर करा