अन राष्ट्रवादीच्या भोंग्यावर ‘ जन गण मन ‘, सर्व नागरिक एकाच जागी उभे

शेअर करा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भोंगा प्रकरण चांगलेच गाजत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोंग्यावर राष्ट्रगीत वाजवून समाजातील बंधुभाव जपण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

१९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम बाजारपेठेत भोंग्यावर राष्ट्रगीत वाजवण्यात आले. प्रचंड वर्दळ असलेल्या या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होताच नागरिक, स्टेशन परिसरातील हॉटेलचे कर्मचारी, रिक्षाचालक, भाजीविक्रेत्या महिला तसेच इतर सर्व जण राष्ट्रगीत संपेपर्यंत स्तब्ध उभे राहिले होते.

राष्ट्रवादीने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना बदलापूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून समाजातील जाती धर्मात वाद निर्माण होऊ नये आणि बंधुभाव जपला जावा देशातील सर्व धर्मीयांमध्ये एकता कायम रहावी या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे, असे अविनाश देशमुख पुढे म्हणाले.


शेअर करा