नगर ब्रेकिंग..शेततळे पुन्हा ठरले ‘ मृत्यूचा सापळा ‘, बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून शेततळ्यातील पाण्यात भावाचा पाय घसरून तो बुडत असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बहिणीचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रविवारी आठ तारखेला सकाळी ही घटना घडलेली असून पिंपळगाव देवाअंतर्गत असलेल्या मोधळवाडी येथील घाणे वस्तीत ही घटना घडलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, जयश्री बबन शिंदे ( वय 21 ) आणि आयुष बबन शिंदे (वय ६ ) असे मृत्यू झालेल्या बहीण भावांची नावे असून रविवारी सकाळी मुलगी जयश्री आणि तिचा भाऊ धुणे धुण्यासाठी शेततळ्यावर गेले होते त्यावेळी शेततळ्याच्या कडेला खेळत असताना त्याचा पाय घसरून शेततळ्यात पडला आणि बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी बहिणी जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली मात्र ते दोघेही पाण्यात बुडाले.

सदर घटना परिसरात समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला. सदर मृत्यूची घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.

उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून शेततळ्यात पाणी साठवले जात असले तरी शेततळे म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहेत. निसरडा कागद आणि एकदा पाण्यात पडल्यावर बाहेर येण्याची कुठलीच सुविधा शेततळ्यात आढळून येत नाही त्यामुळे या आधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. शेततळ्याला कंपाउंड किंवा शेततळ्यात एखादी साखळी किंवा दोरी जरी ठेवली तरी अनेक जीव वाचवले जाऊ शकतात मात्र या गोष्टीकडे बहुतांश सर्व शेतकरी पाठ फिरवत असून सरकारी पातळीवर देखील या गोष्टीबाबत प्रचंड उदासीनता आढळून येत आहे.