
देशात वाढत असलेल्या महागाईचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आणि भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे.सदर प्रकाराची सोशल मीडियात जोरदार निंदा करण्यात येत असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली मानसिकता दाखवून दिल्याची देखील टीका केली जात आहे.
बालगंधर्व मंदिर सभागृहात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या घुसल्या आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादींच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या महिला कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. मनमोहन सिंह यांच्या काळात महागाईचे मुद्दे जोरदार मांडून चक्क बांगड्या भेट पोहचवण्यापर्यंत मजल गेलेल्या स्मृती इराणी आता मात्र महागाईच्या मुद्द्यावर गप्प आहेत.
भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिलांना घेऊन जात होते त्यावेळी त्यांना चापट मारली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हॉटेलमधून स्मृती इराणी कार्यक्रमस्थळी निघाल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. स्मृती इराणी यांना बाहेर येता आले नव्हते. पोलिसांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतरच त्यांना बालगंधर्व कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.