‘ तोपर्यंत ‘ नगर महापालिकेच्या दारातून हटणार नाही , काय आहे प्रकरण ?

नगर शहरानजीक असलेल्या बोल्हेगाव इथे काही जणांनी भरवस्तीत रस्ता खोदून नागरिकांची अडचण केली. सदर खोदलेला रस्ता पूर्ववत करावा आणि रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकावे या मागणीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून महापालिकेत आंदोलन सुरू असून रात्री देखील आंदोलनकर्ते महापालिकेसमोर पाहायला मिळत आहेत तरीदेखील सालाबादप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. आंदोलनात सहभागी महिलांनी देखील या बद्दल संताप व्यक्त केला असून हक्काच्या रस्त्यासाठी सरकारी कार्यालयासमोरच मुक्काम करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे अशा शब्दात महापालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

नगर शहरातील बोल्हेगाव परिसरात बिगर शेती सर्वे नंबर 68/3/2 व 68/3/3 मधील रहिवाशांच्या घरासमोरील रस्ता काही जणांनी दोन मे रोजी खोदून काढलेला होता त्यामुळे हा रस्ता पूर्ववत करण्यात यावा यासाठी रहिवाशांनी महापालिकेच्या दारात आणि उंबरठे झिजवले मात्र पाषाणहृदयी महापालिका अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही त्यानंतर अखेर रहिवाशांनी दोन मे पासून महापालिकेच्या दारात आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले. सदर आंदोलनात महिलादेखील सहभागी झालेल्या असून बावीस दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे मात्र महापालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही

सोमवारपासून आंदोलकांनी साखळी उपोषण सुरू केले असून आमचा प्रश्न सोडवला जाईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा इशारा दिलेला आहे. यापूर्वी देखील अनेकदा या आंदोलकांनी महापालिकेचे उंबरठे झिजवले आहेत मात्र कुठेच त्यांना न्याय मिळालेला नाही. आंदोलनकर्त्या व्यक्तींमध्ये अनेकजण वयस्कर असून त्यांना शुगर बीपी आदी आजार देखील आहे त्यामुळे तात्काळ आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करत आता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर पोकळ आश्वासनापलीकडे आंदोलकांना काहीच हाती लागलेले नाही.

महापालिकेचा असला भोंगळ कारभार आता लपून राहिलेला नाही. अनेकदा महापालिका कार्यालयात चकरा मारल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नाही आणि जर झाली तर ती अगदी जुजबी कारवाई होते त्यातून तक्रारदाराचे समाधान होत नाही आणि प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आता कोर्टात प्रकरण चालू आहे असे सांगून महापालिका अधिकारी हात वर करतात असे आढळून येत आहे . प्रभाग पासून तर आयुक्तांपर्यंत सर्वांची कामाची पद्धत समान असून नागरिकांना महापालिकेत न्यायचं मिळत नाही हे दिसून येत आहे.