‘ .. म्हणून तू माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये ‘, महिलेची तोफखाना पोलिसात धाव

शेअर करा

कौटुंबिक हिंसाचार हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. अशीच एक घटना नगर शहरात उघडकीला आलेली असून ‘ मला व्यवसाय करायचा आहे म्हणून तू माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये ‘, असे सांगत एका महिलेचा छळ करण्यात आलेला आहे. सदर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत पती सासरा दीर आणि नणंद यांच्यासह सात जणांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोसिन सुलेमान शेख, नासिर सुलेमान शेख, अंजूम नासिर शेख, रिजवाना अत्तर शेख, आंतर हनीफ शेख, रेश्मा आझाद शेख ( सर्वजण राहणार घोडेगाव तालुका नेवासा ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून पीडित महिलेचे नाव सुरैय्या मोहसीन शेख असे असल्याचे समजते. सदर महिला ही सध्या नगर शहरातील बेलदार गल्ली परिसरात राहत आहे.

सुरैय्या यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘ माझा विवाह मोसिन सुलेमान शेख यांच्यासोबत 2010 मध्ये झाला होता. लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनी लग्नात मानपान नीट केला नाही आणि नीट दिला नाही म्हणून सासरच्या व्यक्तीने छळ सुरू केला आणि त्यानंतर पतीने मला व्यवसाय करायचा आहे म्हणून माहेराहून तू काहीही करून दोन लाख रुपये घेऊन ये असे सांगत मला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती .

काही दिवस आपण हा त्रास सहन केला मात्र त्यानंतर पती सासरा दीर ननंद आणि तिचा पती हे सर्व जण जमले आणि त्यांनी तुला मूलबाळ होत नाही म्हणून आम्ही मोसिन याचे दुसरे लग्न करणार आहोत. तू इथे राहू नकोस जर तू इथे राहिली तर तुला ठार मारू अशी धमकी दिली असे देखील म्हटले आहे. सदर प्रकार असह्य झाल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात धाव घेतली असून न्याय मिळावा अशी अपेक्षा सुरैय्या यांनी व्यक्त केली आहे.


शेअर करा