पुण्यातील ‘ त्या ‘ खुनाचे रहस्य अखेर उलगडले, साक्षीच्या फोनने केला घात

शेअर करा

पुणे शहरालगतच्या हडपसर ग्लायडिंग सेंटर परिसरात 24 तारखेला एका तरुणाचा अमानुषपणे धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आलेला होता. मयत तरुणाचे वडील हे पोलीस दलात कर्मचारी असून अमरावती मध्यवर्ती कारागृहात कारागृह निरीक्षक म्हणून काम पाहतात.

उपलब्ध माहितीनुसार, मयत युवकाचे नाव हे गिरीधर उत्तरेश्वर गायकवाड ( वय 21 राहणार मांजरी ) असे असून त्याचा भाऊ निखिल कुमार गायकवाड ( वय 27 ) यांनी हडपसर पोलिसात सदर प्रकरणी फिर्याद नोंदवली होती . विशेष म्हणजे एका तरुणीवरून हा प्रकार घडलेला असून पाच जणांना सोबत घेऊन ही घटना घडली आणि अखेर खुनाचे कारण देखील समोर आले आहे .

गिरीधर याच्या तरुणाच्या मोबाइलवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला होता. तिला भेटून येतो असं सांगून घरातून गेल्यावर बराच वेळ तो परतलाच नाही. त्यानंतर काही मिनिटांनी अमरावतीला जेलर असलेल्या वडीलांचा घरी फोन आला आणि ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे त्यांनी सांगितले.

मृत गिरीधर गायकवाड आणि साक्षी पांचाळ हे एकाच कॉलेजमधे शिकत असल्याची माहिती समोर आली. साक्षी पांचाळचा प्रेमविवाह झालेला असुन ती गेल्या काही महिन्यांपासून माहेरी रहात होती. तिचा नवरा काल तिला भेटायला तिच्या माहेरी आला असताना त्याला साक्षी पांचाळच्या मोबाईलमधे गिरीधर गायकवाडचे फोन रेकॉर्ड दिसले आणि त्याने साक्षीला गिरीधर याला फोन करून गोड बोलून भेटायला बोलावले.

गिरीधर गायकवाड भेटायला आला तेव्हा तिथे साक्षी पांचाळ तिचा नवरा, नवर्‍याचे दोन मित्र आणि साक्षीचा भाऊ असे पाचजण हजर होते. त्यावेळी गिरीधर गायकवाडवर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला. गिरिधर याची हत्या करण्यासाठीच पती आणि भावाने साक्षीला पुढे करत गिरीधर याला फोन करायला सांगितले आणि त्यानंतर त्याचा खून केला असे आतापर्यंत समोर आले आहे . गिरीधर गायकवाड आणि साक्षी पांचाळ यांच्यातील संबंध हे फक्त मैत्रीपूर्ण होते कि केवळ संशयावरूनच हा प्रकार झाला याचा तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा