नगर महापालिकेचा अनागोंदी कारभार नगरकरांना चांगलाच परिचयाचा आहे. अशीच एक घटना नगर शहरानजीक वांबोरी रोडवर असलेल्या पिंपळगाव माळवी तलावाजवळ उघडकीला आली होती. पिंपळगाव माळवी तलाव परिसरात असलेल्या वृक्षांची बेकायदेशीररित्या काही व्यक्तींकडून कत्तल करण्यात करण्यात आली होती. सदर प्रकरण उघडकीला आल्यानंतर महापालिका अधिकारी साखर झोपेतून जागे झाले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विशेष म्हणजे सदर प्रकरण होईपर्यंत महापालिकेला याचा पत्ताच नव्हता मात्र काही प्रसारमाध्यमांनी ही बाजू उचलून धरल्यानंतर महापालिका अधिकारी खडबडून जागे झाले आणि वनविभाग तसेच महापालिका यांच्याकडून कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. सदर प्रकरणी महापालिकेचे प्रभारी वृक्षअधिकारी शशिकांत नजन यांनी फिर्याद दिलेली असून असून त्यानुसार बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे विलास रामभाऊ शिंदे ( सर्वजण राहणार पिंपळगाव माळवी नगर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पिंपळगाव माळवी परिसरात महापालिकेच्या मालकीची तब्बल सातशे एकर जमीन आहे आणि या जमिनीवर वेगवेगळ्या वृक्षांची झाडे आहे त्यामध्ये बाभूळ, आंबा, कडूनिंब यासह इतरही अनेक वृक्ष आहेत. घटना घडून गेल्यावर पंचनामा करण्यासाठी तिथे पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनाच दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार घडलेला होता. लिंबाची 24, बाभूळची 95 आणि इतर असे एकूण 126 वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू असल्याचे समजते.
नगर येथील शिवप्रहार संघटनेचे गोरख आढाव यांनी या प्रकरणी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर महापालिका अधिकारी ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आणि त्यांनी वृक्षतोडीची पाहणी केली. मनपाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी गेले असताना वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याशी चांगलीच हुज्जत घातली होती त्यामुळे आरोपींवर आता काय कारवाई होणार याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.