‘ मुलगी पोहोच करा अन मुलगा घेऊन जा ‘ , प्रेमप्रकरणातून रंगले ‘ अपहरण कांड ‘

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव इथे उघडकीला आली असून आंतरजातीय विवाह केल्यानंतर तरुणाच्या भावाचे नवरी मुलीची आई, दोन भाऊ आणि दोन मित्रांनी अपहरण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ‘ गुपचूप आमची मुलगी आम्हाला पोहोच करा आणि तुमचा मुलगा घेऊन जा ‘, अशी तंबी देऊन या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते मात्र शेवगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्यानंतर या तरुणाची सुटका करण्यात आली तर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नागेश व्यवहारे असे तक्रारदार यांचे नाव असून ते मूळचे लाडजळगाव येथील रहिवासी असून कल्याण परिसरात त्यांचा व्यवसाय आहे. कल्याण येथील एका हॉस्पिटलमध्ये यांचा भाऊ गणेश हा काम करतो याच दरम्यान त्याचे तिथे काम करत असलेल्या एका मुली सोबत प्रेमसंबंध जुळले होते त्यानंतर त्यांनी घरातून विरोध होत असल्याने आळंदी येथे जाऊन लग्न केले त्यामुळे मुलीच्या घरचे गणेश याच्यावर खार खाऊन होते.

सहा तारखेला संध्याकाळी मुलीची आई, तिचे दोन भाऊ आणि भावांचे दोन मित्र हे व्यवहारे यांच्या घरी आले आणि त्यांनी नागेश यांना आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली त्याच वेळी त्यांनी नागेश यास एका वाहनात बळजबरीने बसवत किडनॅप केले त्यानंतर त्यांनी गाडीमध्ये त्यांना मारहाण केली आणि आमची मुलगी पोहोच करा आणि तुमचा मुलगा घेऊन जा असे सांगितले.

गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या गाडीत काहीतरी गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी वाहन अडवले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आल्यावर विकी प्रकाश कुचे,सुमन प्रकाश कुचे ,राहुल प्रकाश कुचे ( सर्वजण राहणार उल्हासनगर ) आणि महेश उमेश हलकुडे आणि सुनील गुड्डू साळवे ( दोघेही राहणार उल्हासनगर ) यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.