‘ बायकोला घरी पाठवा ‘, म्हणत पोलीस ठाण्याच्या आवारातच तरुणाने घेतले विष

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून बायकोला तिच्या माहेरी आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला चक्क मारहाण करून त्याला बाहेर हाकलून देण्यात आले आणि अखेर त्याने पोलीस ठाण्याच्या समोरच विष घेतले. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ही घटना घडलेली असून तरुणावर आता उपचार सुरु आहेत. विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर काही वेळाने तो बेशुद्ध पडला आणि पोलिसांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मोहन रोड पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलेला असून तरुणाचे नाव जितेंद्र असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, जितेंद्रचं त्याच्या पत्नीशी भांडण झालं आणि संतापून त्याची बायको माहेरी निघून गेली. जितेंद्र पत्नीला घेण्यासाठी सासरच्या घरी पोहोचला मात्र पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि त्याला घराबाहेर हाकलून दिले. जितेंद्रने पोलीस चौकी गाठून पोलिसांकडे मदत मागितली आणि पोलिसांनी त्याच्या बायकोलाही पोलीस स्टेशनला बोलावून घेतले मात्र पत्नीला पुन्हा नांदायला जाणे मान्य न झाल्याने पोलिसांनी जितेंद्रला घरी जाण्यास सांगितलं.

जितेंद्र तेथून निघून गेला आणि काही वेळातच विष घेऊन पुन्हा हजर झाला आणि “पोलीस माझ्या पत्नीला माझ्यासोबत पाठवत नाहीत. पोलिसांनी माझ्याकडे पैसे मागितले. जेव्हा मी पैसे दिले नाहीत, तेव्हा पोलिसांनी माझ्या तक्रारीवर कारवाई केली नाही.” असा आरोप करत त्याने विष घेतले. सुरुवातीला पोलिसांना तो नाटक करतोय असे वाटले मात्र त्याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.सध्या जितेंद्रची प्रकृती ठीक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस तपासात जितेंद्र आपल्या पत्नीला मारहाण करतो आणि तिच्यावर संशय घेतो म्हणून कंटाळून पत्नी माहेरी गेली होती. तिला परत आणण्यासाठी जितेंद्र सासरच्या घरी गेला पण पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यातून हा प्रकार घडला. जितेंद्रने आपल्या पत्नीला यापूर्वीही अनेकदा मारहाण केली आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.


शेअर करा