प्रश्न आज जगण्याचा आहे मृत्यूनंतर एक कोटींचा नव्हे ,अग्निपथच्या मार्केटिंगची पोलखोल

शेअर करा

भारतीय सेना ही एखाद्या कार्पोरेटसारखी नाही तशीच ती एखाद्या उत्पादक कंपनी सारखीही नाही जिच्या उत्पादनाची जाहिरातबाजी केली जाते . वेगवेगळी आकर्षक घोषवाक्य तयार करून तिच्या उत्पादनाची विक्री वाढविली जाते . सेल्स मोहिम राबविली जाते. भारतीय सेना हे आजपर्यंत शौर्याचे , गौरवाचे आणि सार्थ अभिमानाचे प्रतिक राहिले आहे .याच सरकारने 2019 च्या निवडणुकीत याच सैन्याच्या शौर्याचे , जवानांच्या हुतात्म्यांचे गुणगान करून त्या निवडणूकीत मते मागितली होती .देशाचे समस्त नागरिक याच सैन्याच्या संरक्षणामुळे रात्रीची झोप आणि दिवसभराचे सर्व व्यवहारक करत असतो . अशा या व्रतस्थ सेवेत दाखल होण्यासाठी इतिहासात वा स्वातंत्र्यानंतर च्या 70 वर्षात कधी कोणी प्रलोभने , सोयी सुविधा वा आर्थिक लाभाची गणिते मांडलेली नव्हती .

तरूण उत्स्फूर्तपणे या सेवेत दाखल होत होता .2014 सालापर्यंत दरवर्षी 80 हजार तरूण दरवर्षी दाखल होत आले आहेत .अलिकडची दोन वर्ष सोडली तर मोदी काळातही दरवर्षी 40 /45 हजार तरूण दाखल होतच होते . आणि आज सरकारला नव्या ‘ अग्निपथ ‘ या सैन्य भरती योजनेसाठी आकर्षक सोयी – सुविधांची , आर्थिक लाभाची , प्रलोभनांची जाहिरातबाजी करावी लागत आहे . सर्व स्तरावरून या योजनेची एक ‘ सेल्सची ‘ म्हणजे विक्रीची मोहिम राबवावी लागत आहे . कारण ज्या तरूणांसाठी ही योजना आणली ते या योजनेविरोधात गेले तीन – चार दिवस हिंसक आंदोलन करत आहेत . देशाच्या 16 राज्यांमध्ये हे आंदोलन पसरले आहे . त्यामुळे कोणत्याही स्थितीत ही योजना या तरूणांच्या व जनतेच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहेत . एकवेळ ते जनतेच्या गळी उतरेलही कारण जनतेची सारी भिस्त या चॅनल्सवर असते आणि जनतेचा बुध्दीभेद वा दिशाभूल करण्याचा या चॅनल्सना ‘ रोख ‘ 8 वर्षाचा अनुभव आहे पण देशातील तरूणांच्या ही योजना गळी उतरविणे तसे अवघड आहे .

तरूणांचे हे आंदोलन शेतकरी , कामगार , बँक वा LIC कर्मचारी , व्यावसायिक वा व्यापारी यांच्या आंदोलनासारखे नाही की महागाई भत्ता वाढीसाठी छेडलेले आंदोलन वगैरे नाही तर ते आयुष्य आणि त्याबरोबर वाढणार्या वयाचे व त्यातून येणार्या रोजगार हक्काचे हे आंदोलन आहे . जस जसे या तरूणांचे वय वाढत जाईल तस तसा त्यांच्या आयुष्यात नोकरीचा अंधार गहिर होत जाईल हे आजच स्पष्ट करणारे हे आंदोलन आहे . त्या आंदोलनाचे गहिरेपण यात आहे की ते आज 16 राज्यांमध्ये पसरले आहे . त्यात 1/2 दिवसातच दोन डझनाहून अधिक वाहनांना , रेल्वेच्या 50 हून अधिक डबे त्यांनी आगीच्या भक्ष्यस्थानी धाडले , 350 रेल्वेगाड्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या . अनेक भाजपा कार्यालये , नेत्याची निवासस्थाने यांची तोडफोड केली . यापूर्वी याच तरूणांनी ‘ बेरोजगार दिन , रेल्वे भरती आंदोलन ‘ केले होते व तुलनेने शांततेत पार पाडले होते .

आता काही महाभाग ” पोरांनी राष्ट्रीय संपत्ती ‘ चे असे नुकसान करायला नको होते , असे म्हणतात . पण हे तरूण हेही या देशाची राष्ट्रीय संपत्तीच आहे आणि त्यांच्या आयुष्याशी , त्यांच्या भविष्याशी व पर्यायाने देशाच्या भविष्याशी असा खेळ सरकारने करायला नको होता असे मात्र ते म्हणताना दिसत नाहीत ! त्यामुळे आज तरी ही ‘ अग्निपथ ‘ योजना त्यांच्या गळी उतरेल असे तूर्तास तरी वाटत नाही. सरकारच्या सध्याच्या तातडीच्या या विक्री योजनेचा एक भाग म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सेनेचे तिन्ही दलाचे प्रमुख यांची एक प्रदीर्घ बैठक , नंतर एक पत्रकार परिषद असा हा एकूण जामानिमा सेट करण्यात आला . पत्रकार परिषदेत या महाभागांनी हे जाहीर केले की जो तरूण या ‘ अग्निपथ ‘ योजनेत सामिल होईल त्याला आयुष्यात पुढे कसलेही दुःख, दारिद्र्य, कमतरता राहणार नाही .

तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत एकच प्रयत्न राहिला तो म्हणजे या योजनेची तोंड भरून वकिली करणे ! अर्थात याचे आश्चर्य करावे की खेद हाच प्रश्न मनासमोर उभा राहतो . सेल्स मार्केटिंग मध्ये एक ‘ वॉटरमेलन ‘ ही एक थियरी शिकवली जाते . म्हणजे कलिंगड वरून हिरवं – काळपट जरी दिसत असलं तरी ते आतून लाल असतं हे पटवायचं . कलिंगड आतून लालसर असलं तरी ते उत्तम व चवदार असेलच याची खात्री नसली तरी ते तस्सच आहे हे पटवायचं . मा. मोदीजींनी ही जबाबदारी या चार महारथींवर सोपवली असल्याचे या परिषदेत स्पष्टतेने समोर येत होतं .एखाद्या उत्पादनाची जशी वैशिष्ठ्य सांगून जसे ते बाजारात खपवण्याचा प्रयत्न होतो तसा प्रयत्न या पत्रकार परिषदेत या अग्निपथ योजनेबाबत दिसून आला !

‘ अग्निपथ ‘ ची या तरूणांची चार वर्षाची नोकरी आहे . त्यावर सरकारचे किती पैसे खर्च होणार ? आणि जेंव्हा या तरूणांची नोकरी संपेल तेंव्हा त्यांना फार तर 11 लाख पेन्शन मिळेल . आणि त्याला हौतात्म्य आले तर त्याच्या कुटुंबियांना एक कोटी दिले जातील तेही विम्याचे , असे आता सांगितले जात आहे . पण आज या देशात खरा प्रश्न जगण्याचा आहे .मृत्यूपश्चात विम्याचे पैसे मिळवण्याचा नाही ! या देशात प्रत्येक जन्मलेले मूल व त्याचे संगोपन याचसाठी होत असते की पुढे जाऊन तो आपल्या पायावर उभा रहावा व वृध्दापकाळात तो आपला आर्थिक आधार व्हावा ! कोणी आपले बाळ मृत्यू पावून आपल्याला ढीगभर पैसा मिळावा असा कधी विचारच करत नाही तर ते तशी अपेक्षाच कशी ठेवतील ? मात्र आज मिडीया, भाजपा नेते , समर्थक , भक्तगण आणि आज तयार केलेली ही ” सेल्स टीम ” याच सर्व सुविधांचे , लाभांचे गुणगान करण्यात मग्न आहे .

दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर आज सेना अधिकारीही एखाद्या ‘ सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रमाणे आज या ‘ अग्निपथ ‘ च्या मैदानात ‘ उतरले आहेत . त्यांना अशा सूचनाही आहेत की ही योजना अशी एका झटक्यात तयार झाली नसून देशात 1989 पासून असे विचार सुरू झाले होते . त्या दृष्टीने आकडेवारीचा जो खेळ सरकार करत आहे तोही कमालीचा आहे . 2030 पर्यंत देशात 25 वयोगटातील तरूण 50 टक्के होतील .आणि आपली सेना जी सरासरी 30 ते 32 वयोगटाची आहे ती वयाने कमी करून ती 26 वयोगटातील का करू नये ? असे हे सेना अधिकारीच आता सांगत आहेत .लक्षात घ्या ! जे जवान सैन्यात दाखल होऊन 19 ते 20/22 वर्षाची सेवा करून निवृत्त होऊन पुढे मरेपर्यंत पेन्शन घेतात . ते यापुढे 4 च वर्षाची सेवा करून 11 लाख रू. एकदाच पेन्शन घेणार आहेत. मात्र मनोमन देशाचा शिपाईच होऊ इच्छिणाऱ्य तरूणांचे स्वप्न व आयुष्य उध्वस्त करणार्या या योजनेचे आज जोरदार मार्केटिंग चालू आहे .आज या ‘ अग्निपथ ‘ द्वारे तरूणांना ज्या सोयी – सुविधा आणि आर्थिक लाभ देण्याचे ढोल असे पिटले जात असताना आधी आत्तापर्यंत या सैनिकांना जे काही मिळत आले आहे ते का सांगितले जात नाही ? त्याच्यापासून या नव्या सैनिकांना का वंचित ठेवले जात आहे ? याचेही कोणी उत्तर देत नाही .

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी तिन्ही सेना दल प्रमुखांची जी बैठक झाली त्यास चीफ ॲडमिरल हरिकुमार , एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी आणि आर्मी चीफ पी.एस. राज हे उपस्थित होते . पत्रकार परिषदेलाही हे अधिकारी होते .अन्य देशातही अशी लष्करी भरती वा सेवा घेतली जाते हे खरेच पण तिथे सरसकट सर्वच नागरिकांना नोकरी म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून 2 ते 5 वर्षे राष्ट्रसेवा करणे अनिवार्य केलेले आहे . यात तुर्कस्थान , ग्रीक ,इराण ,क्या, स्वीडन ,इस्त्रायल , उत्तर – दक्षिण कोरिया आदी बरेच देश येतात .इथे तर त्या निर्भेळ राष्ट्रसेवेशी नोकरीची सांगड घातली जात आहे . हे सरकार केवळ कार्पोरेटसाठीच काम करत आहे असे आज सर्वच जनता म्हणून लागली आहे . या सरकारने डिफेन्स म्हणजे संरक्षण खात्यातही कार्पोरेटला प्रवेश दिलाच आहे . आता ” देशाचे सैन्य दल ” सुध्दा या ‘ अग्निपथ ‘ च्या निमित्ताने आजच्या ” बाजार व्यवस्थे ” त आणून सोडले आहे . आणि आश्चर्य असे की देशाचे संरक्षणमंत्री व तिन्ही दलाचे अधिकारी अगदी ” चीफ सेल्स एक्झिक्युटिव्ह ” म्हणून काम करत आहेत . ( मा. विजय घोरपडे यांच्या वॉलवरून साभार )


शेअर करा