नगर ब्रेकिंग..पाथर्डीतील ‘ त्या ‘ संशयितांना तब्बल इतके दिवस पोलीस कोठडी

नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात देवराई येथे झालेल्या निवडणुकीनंतर दोन गटात संघर्ष उफाळून आला होता आणि त्यात एकाचा मृत्यू देखील झाला. सदर प्रकरणी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींपैकी सात आरोपींना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर उर्वरित दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे. न्यायाधीश शेख यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, अनिल पालवे, सुनील पालवे, आकाश पालवे, सविता पालवे, संतोष पालवे, अंबादास पालवे , अक्षय पालवे या सात जणांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत तर ज्या वाहनातून संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या वाहनाचा चालक असलेला संजय कारखिले आणि एडवोकेट दिनकर पालवे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सरकारी वकील एडवोकेट नितीन भिंगारदिवे यांनी यासंदर्भात न्यायालयासमोर बाजू मांडली होती.

बाळासाहेब नवनाथ पालवे यांनी फिर्याद दिली असून सोळा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर घटना घडल्यानंतर अनिल पालवे आणि त्याचे पाच साथीदार हे तिसगाववरून एका गाडीतून पळून जात असताना पाथर्डी गुप्तवार्ता विभागाचे पोलीस कर्मचारी भगवान सानप, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी सुमारे दीड तास पाठलाग करून अनिल एकनाथ पालवे, संजय विष्णू कारखिले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, दिनकर सावळेराम पालवे यांना नेवासा फाटा येथून ताब्यात घेतले.

शनिवारी संध्याकाळी निकाल लागल्यानंतर सत्ताधारी गटाला अकरा जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या त्यानंतर आनंद उत्सव साजरा करत असतानाच त्याला गालबोट लागले होते आणि मारामारीला सुरुवात झाली या दरम्यान दोन जणांना जोरदार मारहाण करण्यात आल्याने त्यांना नगर येथे रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. मयत व्यक्तीचे नाव अजय गोरख पालवे असे असल्याचे समजते.

घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली त्यावेळी पाथर्डी-शेवगाव चे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्याचे काम केले. जमाव काही प्रमाणात शांत झाल्यानंतर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयितांची धरपकड सुरु आहे.