एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या प्रकरणात १५ जणांना बेड्या, उच्चशिक्षित अन..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी सांगली येथे पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या कुटुंबातील तब्बल नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी आता पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील 15 जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. वनमोरे बंधू यांनी परिसरातील अनेक खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते त्यातून सातत्याने होत असलेल्या पैशासाठी तगादा सहन होत नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलेली आहे.

डॉक्टर माणिक वनमोरे आणि शिक्षक असलेले त्यांचे बंधू पोपट वनमोरे यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये खाजगी लोकांकडून कर्जाने पैसे घेतलेले असून त्याची परतफेड करण्यास अडचण येत आहे असे म्हटलेले आहे मात्र घेतलेल्या कर्जाचा नक्की आकडा अद्यापपर्यंत स्पष्ट नाही. चिठ्ठीतील नावांवरून पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये डॉक्टर, शिक्षक, एसटी कंडक्टर यांचा समावेश आहे. कर्जाच्या वसुलीसाठी डॉक्टर आणि त्यांचे बंधू तसेच कुटुंबियांना चौकात अडवून वारंवार अपमान केला होता त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती . मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली असून दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे . दोन भावांपैकी एक जण डॉक्टर तर एक जण शिक्षक असल्याचे समजते .

मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले होते. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे.

माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले माणिक हे कुटुंबासहित अंबिकानगर इथे वास्तव्यास होते मात्र सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता तसेच दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता . म्हैसाळ परिसरात घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा