बसस्टँडवर सापडलेल्या सिमकार्डचा वापर करत केले ‘ मोठे कांड ‘, अखेर आरोपीस बेड्या

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून रस्त्यात सापडलेल्या सिमकार्डचा गैरवापर करून एका विकृत व्यक्तीने गावातील महिला आणि पुरुषांना अश्लील फोटो पाठवले आणि एका महिलेचे छायाचित्र डीपी म्हणून ठेवले त्यानंतर सदर प्रकरणात दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचा देखील प्रकार झाला असता मात्र खरा गुन्हेगार सापडल्याने सुदैवाने तो प्रकार टळलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अभिषेक अशोक वाघ ( वय 20 राहणार शिवना तालुका सिल्लोड ) असे आरोपीचे नाव असून त्याला सिल्लोड बस स्टैंडवर एक सिम कार्ड सापडले होते. घरी आल्यानंतर त्याने ते सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकल्यानंतर सिम कार्ड चालू असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या डोक्यात ही विकृत आयडिया आली मात्र सदर कार्ड हे एका मुस्लीम व्यक्तीच्या नावावर होते.

अभिषेक याने स्वतःचे काही अश्लील फोटो काढले आणि आणि त्या सिमकार्डवर तयार असलेल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट असलेल्या महिलांना आणि पुरुषांना पाठवले. ज्या व्यक्तीच्या नावाने हे फोटो पाठवण्यात आले त्याला याची कल्पनाच नव्हती मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि गावात धार्मिक तणाव निर्माण झाला मात्र अखेर या व्यक्तीने उशिरा का होईना पण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

तपास सुरू असताना व्हाट्सअप डीपीवर वाघ याने एका महिलेचे छायाचित्र ठेवले. एकीकडे पोलीस फॉरवर्ड केलेल्या फोटोचा तपास करत असतानाच हा नवीन प्रकार समोर आल्याने सायबर पोलिसांनी देखील कंबर कसली आणि पोलीस अधीक्षक मनिष कलवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, उपनिरीक्षक भरत माने यांच्या पथकाने अवघ्या काही तासांच्या आत आरोपीस जेरबंद केले.