‘ क्रेडिटयुद्ध ‘ प्रकरणात गाजलेली जलवाहिनी पुन्हा फुटली, नागरिक पुन्हा तहानलेलेच

नगर तालुक्यात काही दिवसांपूर्वी बुऱ्हाणनगर पाणी योजना प्रकरणात मोठे राजकारण रंगले होते. बुऱ्हाणनगर पाणी योजनेचा वीजपुरवठा सुरळीत झाला आणि परिसरातील 42 गावांना चांगले पाणी वेळेवर पाणी मिळू लागले यावरून क्रेडिट युद्ध चांगले रंगले होते मात्र पुन्हा एकदा नगर तालुक्यातील शिंगवे येथे ही जलवाहिनी शनिवारी तुटली असून पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे.

नगर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी जमिनीत खारे पाणी असल्याने या योजनेतील पाण्यावरच नागरिकांना आपली तहान भागवावी लागते मात्र सध्या नगर मनमाड रोड आणि नगर औरंगाबाद रोड दोन्ही ठिकाणी आणि रस्त्यांची कामे सुरू असल्याने तसेच गॅस पाईपलाईनचे काम सुरू असल्याने ही वाहिनी अनेकदा फुटलेली आहे तर उरलीसुरली कसर वीज पुरवठाने काढून घेतली त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली.

शनिवारी किराणा दुकानाच्या खालून गेलेली पाईपलाईन फुटली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी या पाइपलाइनला अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली असल्याने शेवटच्या गावांना पाणी पोहोचण्यास मोठ्या अडचणी येतात त्यामुळे मुख्य पाईपलाईनला असलेली अनधिकृत कनेक्टिव्हिटी तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली आहे.