सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत शिंदे गटाची ‘ पहिली बाजी ‘, महाविकास सरकारच्या अडचणी वाढल्या

महाराष्ट्रातील राजकीय घमासनात सर्वोच्च न्यायालयात पोहचलेल्या लढाईत शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालेला असून सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना कारवाईपासून 11 जुलैपर्यंत दिलासा देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळलेली आहे. आता शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना दिलं जाण्याची शक्यता आहे तर भाजपमध्ये देखील हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे .

आम्ही आमच्या कामात आहोत. सत्ताबदलाच्या प्रयत्नात आम्ही नाही. आताही आम्ही आमच्या एका राष्ट्रीय कमिटीच्या बैठकीत जात आहोत. तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांना काय उत्तर द्यायचं, काय कारवाई करायची आणि त्याला शिंदे गटातून काय उत्तर दिलं जातं हा त्यांचा मुद्दा आहे. महत्वाची बाब म्हणजे हा पूर्णपणे शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यात भाजपचा कुठेही सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली असून ‘हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!’, असे ट्विट केले आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे त्यामुळे आता 11 जुलैपर्यंत या आमदारांवर कारवाई होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे

महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय घमासान सुरू असून शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शंका फेटाळून लावत आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून महाविकास आघाडी राज्यात कायम राहील, असे स्पष्ट केले आहे तसेच संख्याबळ असले तर शिंदे गटाने मुंबईत यावे असे देखील आव्हान शरद पवार यांनी केलेले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, ‘ बंडखोर आमदार राज्यात परत येतील आणि राज्यात आल्यानंतर त्यातील बहुतांश आमदारांची भूमिका बदलेल. शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांची शक्ती संघटन आणि कौशल्य यांच्या बळावर उभा असल्याने बंडखोरांनी केलेल्या बंडाचा शिवसेनेच्या संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही उलट शिवसेना आणखी मजबूत होईल ‘.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ते पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप सरकारवर देखील शरद पवार यांनी निशाणा साधताना, ‘ अडीच वर्ष महाविकास आघाडीत राहिल्यानंतर अचानकपणे बंड कसे काय केले गेले ? त्यानंतर बंडखोरांनी गुजरात आणि आसाम ही दोन भाजपची सत्ता असलेली राज्य का निवडली ? आणि बंडखोरांकडे जर आवश्यक संख्याबळ असेल तर ते गुवाहाटीत का थांबलेले आहेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिंदे यांच्या गटाला सत्ता परिवर्तन हवे असले तरी या लढाईत उद्धव ठाकरे यांचा विजय होईल अशीही खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.