रहस्य उलगडणार ? उच्चशिक्षित कुटुंबाच्या हत्या आत्महत्या प्रकरणात ‘ एकतर्फी ‘ प्रेमाचा अँगल..कसून तपास सुरु

शेअर करा

नागपूरच्या कोराडी परिसरातील राणे कुटुंबियांच्या आत्महत्येत रोज नवीन नवीन माहिती येते आहे. डॉक्टर असलेल्या पत्नीने ‘कुत्रा रात्रभर भुंकतो. झोपू देत नाही. त्यामुळे त्याला गुंगीचे औषध द्यायचे आहे’, असे सांगून अवंती हॉस्पिटलमधून भूल देण्याचे इंजेक्शन घरी आणले होते मात्र त्यानेच दोन लहान मुले आणि पतीचा जीव घेतला आणि नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. कोराडी पोलिसांची संपर्कातील व्यक्तींशी कसून चौकशी सुरु असतानाच आणखीन दोन नवीन खुलासे झाल्याने पोलिसांना देखील धक्का बसला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, तपास सुरु असताना रायसोनी कॉलेजचे प्राचार्य यांनी गेल्या काही दिवसांपासून धीरज हे तणावात असल्याच्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे तसेच जुलैत केवळ दहा दिवसच ते कॉलेजला आले होते आणि या काळात देखील ते कॉलेजमध्ये दारू पिऊन यायचे, असेही म्हटले आहे.

दुसरीकडे प्राचार्याशिवाय पोलिसांनी धीरज यांच्या एका नातेवाइक महिलेचीही चौकशी केली. या महिलेने दिलेल्या माहितीने पोलिसांना जास्त चकित केले आहे. ‘धीरज माझ्यावर एकतर्फी प्रेम करायचे. ते सतत माझ्याशी मोबाइलवरद्वारे संपर्क साधायचे. प्रेम करीत असल्याचे ते सांगायचे. मात्र, मी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांना अनेकदा फटकारलेही होते ‘, असे महिलेने पोलिसांना सांगितल्याचे कळते.

राणे कुटुंबियांचे मृत्यू प्रकरण आणि त्यातील गुंता एक रहस्य बनून राहिलेले असून अद्याप सर्व काही स्पष्ट झालेले नसल्याने रोज नवीन बातमी समोर येत आहे . आत्महत्येपूर्वी सुषमा यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. सुसाईड नोटमध्ये, ‘ पती धीरज हा खूप खचला आहे. त्याचीही अवस्था पाहू शकत नाही, त्यामुळे असा निर्णय घेत आहे ‘ असे लिहलेले आहे. दरम्यान पती धीरज यांची मानसिक अवस्था इतकी खराब असण्यामागे नेमके काय कारण होते याचा उलगडा अद्याप होणे बाकी असून धीरज यांना एक प्राध्यापक ब्लॅकमेल करत असल्याची देखील चर्चा आहे.

काय आहे प्रकरण ?

मयत धीरज राणे वानाडोंगरी (वय ४१ ता. हिंगणा ) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा राणे नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होत्या . त्यांना ध्रुव धीरज राणे (११) लावण्या धीरज राणे (५) अशी दोन मुले देखील होती . सुखवस्तू असलेले राणे कुटुंबीय संत जगनाडे सोयायटी, ओमनगर, कोराडी नाका इथे राहत होते. मंगळवारी (दि. १८) दुपारी २ वाजताच्या सुमारास सर्वांचेच मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती.

सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी पोहचले आणि दरवाजा उघडून पाहिले असता पती धीरज, धुव्र व वन्या यांचे मृतदेह एका खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. याच खोलीत इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरिंज आढळून आल्या होत्या तर डॉ. सुषमा यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. एकाच कुटुंबातील असे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.


शेअर करा