के.के.रेंजच्या विस्तारीकरणाच्या विरोधात सुजय विखेंनी दंड थोपटले..पहा काय म्हणाले ?

शेअर करा

के.के. रेंजच्या विस्तारीकरणाची चर्चा सध्या नगर पारनेर आणि राहुरी तालुक्यात जोरात असून ग्रामस्थांचा के.के. रेंजसाठी जागा देण्यास विरोध असल्याचे साधारण चित्र आहे. अशातच आता यात राजकीय मंडळीदेखील या विषयात रस घेत असल्याने या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच पेटण्याची चिन्हे आहेत . के.के. रेंज संदर्भात खासदारसुजय विखे यांनी ढवळपुरी इथे ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले.

सुजय विखे म्हणाले, ” १९८० पासून के के रेंजचे आरक्षण पडले आहे, व आताही २०२६ पर्यंत या आरक्षणाला मुदतवाढ दिली गेली आहे. पण आज पर्यंत राज्यातील कोणत्याही सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे मागील भाजप सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. तेवीस बाधित गावातील किती शेतकऱ्यांचे किती क्षेत्र जाते, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडेही नाही. बाधित क्षेत्राचा नकाशा कोणाकडे नाही. त्यामुळे किती नुकसान भरपाई मिळणार, याचेही सारे अंदाज चुकीचे आहेत “

याचदरम्यान खासदार सुजय विखे यांनी त्यांनी यासाठी आतापर्यंत काय केले आहे याची देखील माहिती दिली. पुढे ते म्हणाले, ” मागील दोन महिन्यापासून या विषयाशी सर्व पत्र व्यवहार मी संकलित केले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून घेतलेल्या लष्कराच्या जमिनीचा परतावा जमिनीच्या रूपातच द्यावा लागतो, हा कायदा आहे. पण १९८० पासूनच्या राज्य सरकारने तो पाळलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी न्यायालयात जाणार व त्यांचा सर्व खर्च आपण स्वतः उचलणार आहे. बाधित २३ गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी के.के.रेंजमध्ये जाणार आहेत, अशा बाधित १० सर्वपक्षीय शेतकऱ्यांची समिती गावागावातून करावी आणि या समितीने शेतकऱ्यांचे म्हणणे संकलित करून माझ्याकडे द्यावे. जेणेकरून न्यायालयीन लढ्यासाठी ती उपयोगी ठरेल “.

के.के.रेंज विस्तारीकरणाचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील २३ गावांमधील शेतकऱ्यांकडून विस्तारीकरणाला विरोध वाढत आहे. याशिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू लागले आहेत. त्याच अनुषंगाने विखे यांनी आजपासून शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी दौरा सुरू केला आहे. लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या सुजय विखे यांच्या बैठकीत सोशल डिस्टंशिंगचा मात्र चांगलाच फज्जा उडाल्याचे यावेळी दिसून आले. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर अडवून वेठीस धरणाऱ्या शासकीय यंत्रणेला हे दिसत नाही का ? असा देखील जनतेला पडला आहे.


शेअर करा