नगर ब्रेकिंग..अपहरण धर्मांतर अन अत्याचार तरीही पोलिसांकडून टाळाटाळ , मात्र अखेर..

शेअर करा

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथे एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका अल्पवयीन मुलीचे शाळेतून अपहरण करून धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यासोबत निकाह करण्यात आला. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर ( वय ३५ ) याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत. पीडित मुलीच्या घरच्यांनी याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाणे इथे तब्बल तीन वर्षांपासून हेलपाटे मारले होते मात्र पोलिसांकडून या प्रकरणात दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीराम सेनेने या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलीस कामाला लागले.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी इम्रान हा आधीच विवाहित असून गेली तीन वर्षे पीडितेचे नातेवाईक पोलिसांकडे मदतीची याचना करत होते मात्र त्यांना काहीच प्रतिसाद पोलिसांकडून मिळत नव्हता. स्थानिक पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला असून तब्बल तीन वर्ष पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवूनही पिडीतेची तक्रार स्थानिक पोलिस दाखल करून घेत नव्हते. श्रीराम सेनेने या प्रकरणात पुढाकार घेतल्यानंतर सूत्रे हलली आणि आरोपी गजाआड झाला .

आरोपीने 2019 मध्ये 13 वर्षाची असताना पीडितेला बळजबरीने शाळेतून उचलून तिचे अपहरण केले होते आणि त्यानंतर तिचे धर्मांतर केले. तिचे धर्मांतर केल्यावर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षापासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ आरोपी करत होता. मुलीचे वय आता १६ वर्षे असून ती गर्भवती आहे. अत्याचार करणारा आरोपी हा आधीच विवाहित असून त्याचे वय जवळपास पीडितेच्या दुप्पट आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये तो वास्तव्यास असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याची या परिसरात मोठी दहशत असल्याने त्याने इतरही अनेक मुलींसोबत असा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या घरच्यांनी केला आहे सोबतच त्याची दहशत असल्याने कोणी पुढे येत नाही असेही म्हटलेले आहे. श्रीरामपुर स्थानिक पोलिसांकडून देखील या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

अपहरण , अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर इतके गंभीर प्रकरण असूनही पोलिसांनी या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेतली ? यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अत्याचारानंतर मुलगी गर्भवती असल्याने आता अपहरण, बलात्कार, पोक्सो तसेच अट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करणारे पोलिस निरिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी श्रीराम सेनेचे राज्य अध्यक्ष सागर बेग यांनी केली आहे.


शेअर करा