
एकीकडे नागरिकांचे जीवन वाढत्या महागाईने हैराण झालेले असून त्यात विद्युत बिल देखील वाढलेले असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. घरगुती गॅस पूर्वीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग झाला मात्र तरीही केंद्र सरकारला याची कुठलीच जाणीव नाही. गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून की काय आता महावितरण देखील मनमानी पद्धतीने लाईट बिल पाठवत आहे.
वास्तविक नियमाप्रमाणे विद्युत मीटरचे रीडिंग घेऊन बिल पाठवणे क्रमप्राप्त असताना वेगवेगळी कारणे देत विद्युत बिल विद्युत मीटरची रिडींग घेण्यात येत नाहीत आणि त्यानंतर अंदाजे बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहे. युनिटप्रमाणे घरगुती बिलाचे वेगवेगळे स्लॅब असून त्यानुसार बिलाची आकारणी होत असते मात्र मनमानी पद्धतीने रीडिंग टाकल्याने वेगळ्या पद्धतीने त्याचा हिशोब होऊन साधारण 400 ते 500 रुपये अधिक बिल नागरिकांना येत आहे. विद्युत मीटरचे रीडिंग हे वेळच्या वेळी खरेतर महावितरण कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवे मात्र अनेक ठिकाणी हे कर्मचारी पोहोचत नाहीत आणि मनमानी पद्धतीने बिल आकारण्यात येते अशाही अनेक तक्रारी आता येण्यास सुरूवात झालेली आहे.