पत्रकाराची हत्या करणे भोवले , तब्बल ‘ इतक्या ‘ जणांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप ठोठावली

शेअर करा

अनेकदा वृत्तांकन केल्यावर आरोपींकडून पत्रकाराविषयी खुन्नस धरण्यात येते आणि त्यानंतर पत्रकारांना त्रास देणे सुरू होते. कायदेशीर कारवाईच्या पुढे जात देखील अनेकदा प्रकरण हाणामारी आणि चक्क खुनापर्यंतही पोहोचले जाते. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चैनपुर येथे घडली होती. पत्रकार संजय गोविंद वाघमारे वाडेकर यांचा २०१८ साली काही व्यक्तींनी खून केला होता त्यानंतर सदर प्रकरणातील दहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पत्रकारावरील हल्ला हा निषेधार्ह असला तरी अनेकदा काही गुंड प्रवृत्तीचे लोक कायदा हातात घेऊन पत्रकारांना त्रास देत असल्याची अनेक उदाहरणे याआधी देखील समोर आलेली आहेत.

चैनपुर येथील रहिवासी असलेले संजय वाघमारे वाडीकर आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मारोती झगडे यांच्या तळ्यातील माती उपसा करण्यावरून वाद होत होता त्यावेळी मारुती झगडे याने संजय यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोन जून 2018 रोजी सकाळी साडेसात वाजता संजय चहा पिऊन घरासमोर बसलेले असताना आरोपी तिथे आले आणि संजय यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून संजय यांना मारहाण सुरू केली.

आरोपींनी केलेल्या जोरदार मारहाणीत संजय यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी वाघमारे यांनी देगलूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मनीषा पवार यांनी तपास केला आणि काही कालावधीने हा तपास ज्ञानोबा काळे यांच्याकडे देण्यात आला.

सदर प्रकरणात नऊ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या तसेच बचावपक्षाने देखील साक्षीदार तपासले आणि अखेर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी मारुती झगडे व इतर नऊ जणांना कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि पंचवीस हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे . सदर निकालाने माध्यम क्षेत्रात संजय वाघमारे यांच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना असून सॉफ्ट टार्गेट समजून पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या प्रवृत्तींना ही एक चपराक आहे.


शेअर करा