नगर शहर शिवसेनेकडून राज्यपालांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याचा जोरदार निषेध

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेला धक्का पोहोचेल असे वक्तव्य करताना दिसून येत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी गुजराती आणि राजस्थानी समुदाय यांच्यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रीयन जनतेच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले होते. त्याचा नगर शहर शिवसेनेच्या वतीने दिल्लीगेट येथे भरपावसात आंदोलन करून निषेध करण्यात आलेला आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी राज्यपाल यांच्याविषयी बोलताना, ‘ राज्यपाल हे अतिमहत्त्वाचे पद आहे मात्र या पदावर असलेली व्यक्ती ही कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहे. केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांना पुन्हा दिल्लीला बोलावून घ्यावे. त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा फक्त शिवसेना नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिक हा निषेध करत आहे, ‘ असेही ते पुढे म्हणाले सोबतच यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात येणार आहे असेही ते पुढे म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात नगर शहरातील शिवसेना एकवटलेली पहायला मिळाली यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय देखील उपस्थित होता. राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.