राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बनले ‘ माफीवीर ‘, माफीनाम्यात काय म्हटलंय ?

शेअर करा

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार दिवसांपूर्वी गुजराथी आणि राजस्थानी समुदायाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्ष यांच्याकडून जोरदार टीका होऊ लागल्याने तसेच त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आल्यानंतर राज्यपालांना आता उपरती झालेली असून त्यांनी आपल्या या विधानाबद्दल जनतेची माफी मागितली आहे. राज्यपाल यांच्याकडून अर्थात हा प्रकार प्रथमच घडलेला नाही या आधी देखील त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत.

राज्यपालांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यामध्ये, ‘ गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील जनतेचे अपार प्रेम मला मिळालेले आहे. मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला मात्र त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्याला थोर महाराष्ट्र राज्याचा अपमान समजला जाईल याची मला कल्पना देखील करवत नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक संताच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्य सेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुन्हा प्रत्यय देईल असा विश्वास वाटतो, ‘ असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर गुजराती आणि राजस्थानी बांधवांकडून देखील राज्यपाल यांच्यावर टीका करण्यात आली होती. राज्यपाल यांचे हे विधान हे समुदायांमध्ये फूट पाडणारे आहे त्यामुळे महाराष्ट्रातील एकोपा भंग होऊ शकतो अशा देखील प्रतिक्रिया गुजराती आणि राजस्थानी बांधवांनी व्यक्त केल्या होत्या त्यामुळे ज्यांचे कौतुक केले तो गुजराती आणि राजस्थानी समुदायच आपल्यासोबत नसल्याने राज्यपाल यांना उपरती आले आणि त्यांनी सपशेल माफी मागितलेली आहे.


शेअर करा