नेवाश्यात ‘ फिल्डिंग ‘ लावून तयारी होती अन इशारा होताच प्रकल्प अधिकारी जाळ्यात

महाराष्ट्रात सरकार दरबारी असलेल्या भ्रष्टाचाराचे पूर्णपणे उच्चाटन करणे अद्यापही शक्य झालेले नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गेल्या काही वर्षापासून सक्रियतेने काम करत आहे. अशीच एक घटना नेवासा तालुक्यात उघडकीला आली असून भाडेतत्त्वावर लावलेल्या चार चाकी वाहनाचे बिल देण्यासाठी नेवासा पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला 45 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

नेवासा पोलीस ठाण्यात पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सोपान सदाशिव ढाकणे यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांचे चार चाकी वाहन बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लावण्यात आले होते त्यावेळी त्यांचे एक लाख 14 हजार रुपये मंजूर करून ते तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रकल्प अधिकारी असलेले सोपान सदाशिव ढाकणे यांनी तक्रारदार यांना पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती त्यानंतर तडजोड करत त्यांनी 45 हजार रुपये द्या, असेही सांगितले.

तक्रारदार यांनी या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीची शहानिशा केल्यावर अधिकाऱ्यांनी सोपान ढाकणे यास रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता आणि त्यानंतर ही रक्कम स्वीकारताना सोपान ढाकणे यास पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सरकारदरबारी कोणी लाच मागत असेल तर टोल फ्री नंबर असलेल्या १०६४ या नंबरवर संपर्क करून आपली तक्रार नोंदवावी त्यानंतर कारवाई करण्यात येईल असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.