श्रीगोंदा इथे रूममध्ये घुसून विद्यार्थ्यांवर चाकूने वार , एक जण ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे एका खाजगी ग्रंथालयात घडलेली आहे. बाहेरील गावावरून शिक्षणासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला दोन जणांनी रात्री रूममध्ये घुसून दमदाटी करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला किरकोळ कारणावरून केलेला आहे. दीपक नाना भालेराव ( राहणार कल्याण ) असे या जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, दीपक भालेराव हा कल्याण येथील रहिवासी असून श्रीगोंदा येथे एका खाजगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेतो. या संस्थेचे ग्रंथालय असलेल्या ठिकाणी शनिवारी तीस तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास सुरज दत्तात्रय गंगावणे व विशाल दत्तात्रय गंगावणे ( राहणार गुरव पिंपरी तालुका कर्जत ) यांनी दीपक हा बोलत असताना त्याला ‘ हळू बोल ‘ असे सांगितले त्यातून त्यांच्यात किरकोळ वाद झाला तेव्हा दीपक याने सुरज याच्या कानाखाली मारली. त्यानंतर सूरज याने गुरव पिंपरी येथील त्याच्या भावाला बोलावून घेतले आणि रविवारी रात्री पावणे एकच्या सुमारास सुरज आणि विशाल गंगावणे यांनी दीपक याच्या खोलीत जाऊन त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले.

दोन्ही सख्ख्या भावांनी केलेल्या या हल्ल्यात दीपक भालेराव हा गंभीर जखमी झालेला असून नगर येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटना घडली त्यावेळी प्रत्यक्षदर्शी असलेला अभिषेक कराळे याने यासंदर्भात फिर्याद दिली असून सुरज गंगावणे यास तात्काळ अटक करण्यात आलेली आहे तर दुसरा आरोपी हा अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती आलेला नाही. न्यायालयाने त्यांना तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.


शेअर करा