पुणे हादरलं..’ आता तरी सुधर ‘ सल्ला दिला म्हणून भावावर ३८ वार

पुणे जिल्ह्यात बारामती इथे एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून बारामती एमआयडीसीजवळील रुई परिसरात सख्ख्या मावस भावावर तब्बल ३८ वार करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे. गजानन पवार ( वय 28 मूळ राहणार जिल्हा हिंगोली सध्या राहणार बारामती ) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.

रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे गजानन हे राहायला होते आणि त्या घरातच त्यांचा खून करण्यात आला. गजानन यांचा मुलगा शाळेतून घरी आलेला असताना त्याने वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आणि त्यानंतर ही घटना समोर आली. पोलीस घटनास्थळी आलेले असताना या युवकावर तब्बल 38 वार करण्यात आल्याचे समोर आले. इतक्या भयानक पद्धतीने झालेली ही हत्या पाहून पोलीस देखील गडबडून गेले.

पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली त्यावेळी गजानन यांचा मावस भाऊ संतोष गुळमुळे ( राहणार वसमत जिल्हा हिंगोली ) हा गजानन यांच्यासोबत केशकर्तनालयात काम करत असल्याची माहिती समोर आली तसेच तो नशा देखील करतो ही माहिती समोर आल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील संतोष आढळून आला.

पोलिसांनी बारामती बस स्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल ढाबे आदी ठिकाणी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्याला जेरबंद केले. संतोष हा नशा करत असल्याने त्याचा मावसभाऊ गजानन हा त्याला सतत नशा करू नकोस आत तरी सुधर म्हणून सल्ले देत होता त्यामुळे संतोष हा त्यांच्यावर खार खाऊन होता म्हणून त्याने हे कृत्य केले असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे .