‘ नागाला कितीही दूध पाजा तो.. ‘ , उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

राज्यात सुरु असलेल्या राजकीय अस्थिर परिस्थितीबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाना साधला असून ‘ एक गुलाब केले पण दुसरे गुलाब वाघ आले. नागाला कितीही दूध पाजा तो चावतो म्हणजे चावतो. त्यांना निष्ठेचे कितीही दूध पाजले तरी ते गद्दार निघाले ‘, अशा शब्दात खडसावले आहे.

जळगाव आणि नाशिक येथील काही शिवसैनिकांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके आणि गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी ठाकरे म्हणाले की, ‘ शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत भगवा झेंडा रोवलेला आहे. आतापर्यंत अनेक वेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले आणि आता देखील शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि भाजप अध्यक्ष यांनी परवा ते बोलुन देखील दाखवले .

राजकारणात हार-जीत होत असते मात्र आता त्यांच्याकडून संपवण्याची भाषा केली जात आहे. आत्तापर्यंत कुठल्याही राजकारणी व्यक्तीकडून कुणाला संपवण्याची भाषा झालेली नव्हती. त्यांनी आपली लढाई दोन तीन पातळ्यांवर आहे हे सुरू आहे हे शिवसैनिकांच्या लक्षात आणून दिले आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण कुठेही कमी पडणार नाही तर कायद्याची लढाई देखील सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आपले वकील किल्ला लढवत असून न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. ही तिसरी लढाई देखील तेवढीच महत्त्वाची आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो इथे येण्यापेक्षा जागेवर पाय रोवून उभे रहा. लढाई कागदाची देखील आहे त्यामुळे शिवसेनेचे जास्तीत जास्त पदाधिकारी आणि सदस्य यांची प्रतिज्ञापत्रे जमा करा, असेही ते पुढे म्हणाले.