क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या संगमनेरच्या ‘ त्या ‘ प्रकरणात अखेर कोर्टाचा निर्णय

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यात 2016 साली एक खळबळजनक घटना घडली होती. तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे येथे दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या पत्नीला गर्भपात करण्यास सांगितले होते मात्र तिने नकार दिल्यानंतर पतिचा संताप अनावर झाला आणि त्याने तिचा गळा आवळून तसेच त्यानंतर लाईटचा शॉक देऊन अमानुषपणे खून केला होता. सदर प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने तीन तारखेला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे तर मयत महिलेची सासू आणि दीर यांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आले नाही त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भाऊसाहेब संभाजी कदम ( तालुका राहता ) यांची मुलगी वर्षा बाळासाहेब पिलगर ( वय 27 राहणार आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर ) हिचे बाळासाहेब भिकाजी पिलगर याच्यासोबत लग्न झाले होते त्यानंतर ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली म्हणून वर्षा हिचा गर्भपात करावा अशी तिचा पती बाळासाहेब पिलगर आणि सासू लिलाबाई आणि दीर सुरेश भिकाजी पिलगर यांचा आग्रह होता मात्र या अमानुष प्रकाराला मयत वर्षा ही विरोध करत होती. याचा राग मनात धरून पती बाळासाहेब, तिचा दीर सुरेश आणि सासू लिलाबाई यांनी 30 जुलै 2016 रोजी तिचे उशीने तोंड दाबले आणि त्यानंतर तिच्या बोटाला वायर जोडून शॉक दिला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असा त्यांच्यावर आरोप होता.

सदर प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला .सदर प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश कामाले,हवलदार तात्याराव वाघमारे हे तपास करत होते. सदर खटल्यात १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी कोर्टासमोर आपले म्हणणे प्रभावीपणे मांडले . जिल्हा न्यायालय न्यायाधीश वाय पी मनाठकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी भाऊसाहेब कदम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.