जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई अन ‘ त्या ‘ पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कंबर कसली असून गेल्या काही महिन्यांपासून महसूल आणि पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणावर विभागाकडून कारवाया करण्यात आलेल्या आहेत. अशीच एक कारवाई तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शैलेश गोमसाळे यांच्यावर करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवरील कारवाई टाळण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी शैलेश गोमसाळे यांना अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे. सदर प्रकाराची पोलीस उपाधीक्षक स्वतः चौकशी करतील असेही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.

अवैध दारू विक्रीवरील कारवाई टाळण्यासाठी पोलीस नाईक शैलेश गोमसाळे यांनी लाच घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलिसांच्या नावाने लाच घेताना खाजगी व्यक्ती असलेला वैभव साळुंके याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. शैलेश गोमसाळे आणि वैभव साळुंखे यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. गेल्या काही महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीच्या विरोधात चांगलीच मोहीम राबविली असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारदरबारी कोणी आपले काम करून देण्यासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 10 64 या टोल फ्री नंबरवर आपली तक्रार द्यावी त्यानंतर तिची शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.