महाराष्ट्र हादरला..प्राध्यापकाच्या खून प्रकरणात ‘ नको तो ‘ अँगल आला समोर

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात समोर आली असून उमरखेड येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत दिग्रस तालुक्यातील एका गावात आढळून आलेला होता. हातावर सचिन नाव गोंदलेले असल्याने पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आले आणि त्यानंतर अवघ्या काही तासात सदर प्रकरणातील आरोपी त्यांची पत्नी धनश्री देशमुख आणि तिचा प्रियकर शिवम बचके यास गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या. सचिन देशमुख यांची पत्नी धनश्री आणि तिचा प्रियकर शिवम बचके हे दोघेही वनविभागात कार्यरत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, उमरखेड इथे कृषी महाविद्यालयात प्राध्यापक सचिन देशमुख हे कार्यरत होते तर त्यांची पत्नी धनश्री ही वनविभागात नोकरीला होती याच दरम्यान तिचे वनविभागात वनपाल म्हणून कार्यरत असलेला शिवमय बचके याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यातून त्यांनी प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेला पती सचिन यांचा खून करण्याचा निर्णय घेतला.

सचिन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी निघाले होते मात्र दिग्रस तालुक्यात यांचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात त्यांचा खून हा गळा आवळून झाल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी तपासाला गती दिली. उमरखेड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला त्यावेळी वनपाल म्हणून कार्यरत असलेला शिवम चंदन बचके ( वय 33 राहणार आकोट ) आणि सचिन देशमुख यांची पत्नी वनपाल धनश्री देशमुख ( वय 28 ) यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असण्याचा अँगल समोर आला आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस, उमरखेड पोलीस, एलसीबी सायबर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून सदर गुन्ह्यात इतरही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने देखील तपास करत आहेत.