
नगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून शहरातील रस्त्यांची पुन्हा एकदा दुरवस्था झालेली आहे तर अनेक रस्त्यांची कामे पावसामुळे अर्धवट देखील सोडून देण्यात आलेली आहेत. नगर शहर आणि उपनगरात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे करण्यात आलेली होती मात्र अवघ्या तीन दिवसांच्या जोरदार पावसाने रस्ते पूर्णपणे वाहून गेले असून नागरिक पुन्हा एकदा खड्डे चुकवण्याची सर्कस करत आहेत.
एकीकडे शहरातील खड्ड्यांनी नगरकर परेशान झालेले असताना दुसरीकडे महावितरणचा देखील सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. पाऊस येणार अशी चिन्हे दिसताच शहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत होत असून सावेडी उपनगरात देखील दोन दिवसापूर्वी रात्री तब्बल आठ तास वीज गायब झाली होती. वादळी पाऊस येण्याची शक्यता असल्याने अपघात होण्याची शक्यता असेल म्हणून गेली असेल लाईट असे समजून नगरकर देखील निमूटपणे हा त्रास सहन करत आहेत.