नगर ब्रेकिंग..’ बायकोला पोहता यायचे म्हणून बुडवून मारले ‘ प्रकरणी कोर्टाचा निर्णय आला

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना कर्जत तालुक्यातील चलाकेवाडी येथे घडली होती. 2020 आली घडलेल्या या घटनेत मयत महिलेचा पती याला श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची साधी कैद असे या शिक्षेचे स्वरूप आहे. आरोपी व्यक्तीने त्याच्या पत्नीचा चक्क विहिरीतील पाण्यात पाडून त्यानंतर तिला पोहता येत असल्याने चक्क बुडवून खून केला होता.

उपलब्ध माहितीनुसार, सुरेश सिद्धू खटके ( वय 35 राहणार चलाकेवाडी तालुका कर्जत ) असे आरोपीचे नाव असून आरोपी सुरेश याने त्याच्या गट क्रमांक 287 मध्ये असलेल्या विहिरीत 12 जून 2020 रोजी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अत्यंत अमानुषपणे तिचा खून केला होता. विहिरीच्या पाण्यातील मोटार काढण्याच्या बहाण्याने त्याने तिला बोलावले आणि पाण्यात ढकलून दिले मात्र तिला पोहता येत होते म्हणून चक्क विहिरीतील पाण्यात उडी घेऊन त्याने तिला बुडवून बुडवून मारले असे फिर्यादीत म्हटले होते.

सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी माने यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. सदर खटल्यांमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील संगीता अनिल ढगे यांनी सरकारची बाजू न्यायाधीशांच्या समोर प्रभावीपणे मांडली आणि त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.


शेअर करा