मठाधिपती बुवासाहेब खाडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल , नगरमध्ये ऍडमिट

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात एक अत्यंत खळबळजनक घटना खर्डा येथे उघडकीला आलेली असून सोन्याचे दागिने घेऊन देण्याचे आमिष दाखवत तसेच विवाह करण्याचे आमिष दाखवत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची फिर्याद एका महिलेने जामखेड पोलिस ठाण्यात दिलेली आहे त्यानंतर चार ऑगस्ट तारखेला बुवासाहेब खाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही पती सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने जामखेड तालुक्यातील एका गावात राहते. मठात गेल्यानंतर संकटे दूर होतात अशी तिची धारणा होती त्यातून तिने हनुमानगड येथे वारीला जायला सुरू केले. दर आठवड्याला वारीला गेल्यानंतर ती हनुमानगड येथे मुक्काम देखील करायची त्यावेळी खाडे महाराज आणि या महिलेची चांगलीच ओळख झाली.

महिलेने म्हटल्याप्रमाणे रात्र झाली की खाडे महाराज तिला खोलीत बोलावून स्वतःचे पाय चेपून दे असे सांगत असायचे. महिलेची या महाराजावर श्रद्धा असल्याने महिलेला याबद्दल काही संशय आला नाही तसेच खाडे महाराजाची मुलगी ज्योती मिसाळ हिची देखील यानंतर महिलेसोबत ओळख झाली आणि तिनेही ‘ मी आणि महाराज सांगतील तसे तू ऐकत जा. महाराजांची सेवा करण्यासाठी तू इथेच राहा, ‘ असा देखील या महिलेला आग्रह केला.

काही दिवसांनी संशयित आरोपी महाराज हे महिलेच्या नातेवाईकाच्या गावी आले असताना महाराजांनी आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ‘ तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊ नकोस. तुला दागिने करून देईल. तुझ्या सोबत लग्न करीन. तुझ्या मुलाला चांगले सांभाळीन. त्याच्या नावावर देखील पाच एकर जमीन करीन आणि जर तू कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारीन ‘, अशी देखील महाराजांनी आपल्याला धमकी दिली असे महिलेचे म्हणणे आहे. महाराजाने आपल्यावर एक महिन्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला असे महिलेचे म्हणणे असून सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील पुढील तपास करत असल्याचे समजते.

दुसरीकडे खाडे यांनीही आपल्याला मारहाण झाली असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. मारहाण करुन आपल्याकडील सोन्याच्या ऐवज लुटण्यात आल्याचा दावा खाडे यांनी तक्रारीत केला आहे. जामखेड तालुक्यातील मोहरीमध्ये राहणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल गीते, रामा गीते यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून खाडे महाराज यास उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.