सोनई गोळीबार प्रकरणातील ‘ त्या ‘ आरोपीचा जमीन अखेर मंजूर , काय आहे प्रकरण ?

नगर जिल्ह्यात गाजलेल्या नेवासा तालुक्यातील सोनई येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वसंत शेटे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर शुक्रवारी जामीन मंजूर केलेला आहे. 22 एप्रिल रोजी राहुल राजळे यांच्यावर आरोपीने गोळीबार केला होता त्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा सत्र न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती त्यानंतर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.

काय आहे प्रकरण ?

माजी मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी 22 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. या गोळीबारात ते जखमी झाले होते आणि त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. सदर प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .

राहुल जनार्दन राजळे ( वय 29 राहणार लोहगाव तालुका नेवासा ) हे शुक्रवारी रात्री लोहगाव येथील घरी जात असताना हा प्रकार घडलेला होता. गोरेगाव – लोहगाव रस्त्यावर अचानकपणे चार आरोपींसह इतर तीन चार जण आले आणि त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण करत राजळे यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असे फिर्यादीत नमूद केलेले होते . अचानकपणे झालेल्या या गोळीबारात राजळे यांच्या कमरेजवळ एक गोळी आणि पाठीला एक गोळी लागलेली होती तर हाताला देखील एक गोळी चाटून गेली होती.

सदर प्रकरणी शंकरराव गडाख यांनी बोलताना, ‘ हा हल्ला पूर्णपणे राजकीय असून मला राजकारणातून कायमचे संपवण्याचा विडा तालुक्यातील काही स्थानिक विरोधकांनी उचललेला आहे.गेल्या काही दिवसांपासून खालच्या पातळीवर आरोप करणे, शिवाराळ भाषणे आणि खोट्या केसेस दाखल करणे आणि त्यानंतर चक्क खुनी हल्ल्याचा प्रकार घडलेला आहे. पोलिस यंत्रणा आणि न्याय देवतेवर तर माझा विश्वास असून त्यातून पूर्ण सत्य बाहेर येईल,’ असे देखील ते पुढे म्हणाले होते.