‘ मोदी जब जब डरते है पोलीस को आगे करते है ‘ , महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर

एकीकडे देशात महागाईचा आगडोंब उसळलेला असताना गोदी मीडियामध्ये कुठल्याही पद्धतीची सरकारला प्रश्न विचारण्याची ताकद राहिलेली नाही अशा वेळी काँग्रेस पक्षाने मात्र जनतेशी संबंधित असलेले महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी या मुद्द्यावर देशभरात मोठे आंदोलन सुरू केले असून नवी दिल्ली येथील आंदोलनात दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत गैरवर्तन तर केले मात्र सरचिटणीस असणाऱ्या प्रियंका गांधी यांना देखील चक्क महिला पोलिसांनी फरफटत नेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्यांचे हे वर्तन म्हणजे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे अशी देखील टीका केली जात आहे.

प्रियंका गांधी या रस्त्यावर आंदोलनासाठी बसलेल्या होत्या मात्र महिला पोलीस कर्मचारी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र ते शक्य न झाल्याने अखेर त्यांनी प्रियंका गांधी यांना अक्षरशः फरफटत नेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘ प्रियांका गांधी जिंदाबाद मोदी जब जब डरते है पोलीस को आगे करते है ‘ अशा घोषणा दिल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे हुकूमशाही सरकार घाबरलेले असून भारताच्या परिस्थितीची महागाईची आणि ऐतिहासिक बेरोजगारीची त्यांना भीती वाटत आहे . आपल्या चुकीच्या धोरणामुळे देशाच्या झालेल्या अवस्थेची त्यांना भीती असून त्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तवाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारकडे हिम्मत नाही म्हणून ते धमकावण्याचे प्रयत्न करत आहेत, असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी हे निवडून आलेले आहेत. तुमचे उमेदवार निवडून का येत नाहीत असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता त्यावेळी सदर पत्रकाराला देखील राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, ‘ हिटलर देखील निवडून येत होता कारण त्याच्या हातात सर्व सरकारी संस्था होत्या. भाजपने सत्तेत आल्यानंतर सर्व सरकारी संस्था आणि देशाचे अर्थकारण आपल्या हातात घेतलेले असल्याने आम्हाला अडचणी येत आहेत,’ असे सांगत ‘ माझ्या हातात हे सगळे द्या मग दाखवतो ‘ असाच उलट प्रश्न या पत्रकाराला केला त्यावेळी पत्रकार देखील निरुत्तर झालेला पाहायला मिळाला.