महाराष्ट्र हादरवणाऱ्या भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणात नक्की काय घडलंय ?

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीला आली असून कन्हाळमोह गावाजवळ ही घटना घडलेली असून गोंदिया जिल्ह्यातील एक महिला घरगुती वादातून घराबाहेर पडलेली असताना तीन जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित महिला सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अमानुष हत्येचा कळस गाठणाऱ्या या घटनेनंतर तिच्या शरीरातील रक्तस्त्राव थांबविण्यासाठी आणखी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे. सदरप्रकरणी पुढील चौकशी एटीएसने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एक पस्तीस वर्षीय महिला तीस जुलै रोजी घरगुती भांडण झाल्यानंतर घराबाहेर पडलेली होती. भंडारा जिल्ह्यातील तिच्या माहेरी ती पायी जात असताना तिला श्रीराम उरकुडे नावाच्या एका व्यक्तीने तुला गाडीने घरी सोडतो असे सांगून गाडीत बसवले होते मात्र घरी न सोडता त्याने गोंदिया जिल्ह्यातल्या मुंडीपार या गावाजवळ तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला पळसगाव रोडवर घेऊन गेला आणि पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार करून तो पसार झाला.

रात्रीच्या सुमाराला सदर महिला ही एकटी जंगल तुडवत कन्हाळमोह येथे पोहोचली होती त्यानंतर तिथे पुन्हा एका व्यक्तीने तिला घरी गाडीवर सोडण्याचे आश्वासन दिले मात्र तिचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. तिथे असलेल्या ढाब्या शेजारी एक टायर दुरुस्तीचे दुकान होते, त्याने तिला या व्यक्तीसोबत तुम्ही जा तो तुम्हाला व्यवस्थित सोडेल , असे सांगितल्याने महिलेचा विश्वास बसला आणि दुर्दैवाने दुसरा व्यक्ती देखील तसाच निघाला. त्याने दुचाकीवर बसवून तिला जवळच्या शेतात नेले आणि टायर दुरुस्त करणारा व्यक्ती आणि आणि दुचाकीवाला या दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. सतत तीन दिवस हा प्रकार तिच्यासोबत घडल्यानंतर त्यांनी तिला कन्हाळमोह गावाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून तेथून पलायन केले.

कारधा पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत ती रडत रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेली होती त्यानंतर परिसरातील नागरिकांना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आणि तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. तीनपैकी दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे.

अमित सारवे आणि मोहम्मद अंसारी अशी दोन संशयित आरोपींची नावे असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत. सदर गुन्ह्याची सुरुवात ही गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे झालेले असल्याने भंडारा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास गोंदिया पोलिसांकडे वर्ग केलेला आहे. सामूहिक अत्याचारानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी पीडित महिलेची भेट घेतली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे मात्र एक शस्त्रक्रिया आत्ताच झालेली असल्याने आणखी एक शस्त्रक्रिया होण्यासाठी तिची प्रकृती धोक्याबाहेर येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल असे सांगण्यात आले आहे.