नगर ब्रेकिंग..पाणीच पाणी चोहीकडे गेले रस्ते कुणीकडे ?

नगर शहरामध्ये गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून सकाळपासून ते रात्रीपर्यंत अचानकपणे कधीही पाऊस सुरू होतो. नागरिकांचे देखील अचानक आलेल्या या पावसाने मोठ्या प्रमाणात हाल होत असून महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन चक्क कोलमडून पडलेले दिसून येत आहे. शहरातील अनेक वसाहतीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर रस्त्यांच्या बाबतीत केलेल्या उन्हाळ्यातील कामाची अवघ्या पाच दिवसाच्या पावसाने पूर्णपणे वाट लावली आहे.

पावसाळ्यापूर्वी नगर शहरातील नाल्यांची सफाई करून पाणी तुंबणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित होते मात्र खर्च करून देखील महापालिकेच्या कामाला अपेक्षित अशी क्वालिटी नसल्याने पुन्हा सालाबादप्रमाणे नागरिकांच्या घरात पाणी घुसले. शहरातील सर्व ओढे आणि नाले हे अखेर सीना नदीला येऊन मिळतात दरम्यान या रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे देखील झालेली असून ही अतिक्रमणे काढण्यासाठी देखील कुठलेही प्रयत्न करण्याची इच्छाशक्तीच अधिकाऱ्यांमध्ये राहिलेली नाही.

बुरुडगावपासून तर बोल्हेगावपर्यंत नदीपात्रातील पाणी, झाडेझुडपे इतर कचरा काढला असता तर अशी परिस्थिती नागरिकांवर आली नसती. बुरुडगावपासून तर नगर-पुणे रोडवरील पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात जंगल निर्माण झालेले आहे मात्र हे काढण्याची तसदी महापालिकेने कधीही घेतलेली नाही त्यामुळे मात्र पाण्याच्या प्रवाहाला अनेक ठिकाणी अडथळा निर्माण होतो त्यात नागरिकांनी नदीत टाकलेला प्लास्टिक कचरा याने देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले जाते.

नगर शहर आणि उपनगरातील पुर्वापार असलेले ओढे नागरिकांनीच केलेल्या अतिक्रमणानंतर नाहीसे झालेले असून पाण्याचा मूळ प्रवाह असलेले ओढेच गायब झाल्याने देखील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे तर शहरातील पाणी ज्या रस्त्याने वाहून जाते ते म्हणजे पटवर्धन चौक, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, दिल्ली गेट, नालेगाव येथेदेखील अचानकपणे आलेल्या या पावसाने पूर्ण रस्ते वाहून गेलेले आहेत त्यामुळे महापालिकेने उन्हाळ्यात काही प्रमाणात केलेल्या कामाची देखील पोलखोल झालेली असून खड्डे चुकवत कसरत करत वाहने चालवण्याची वेळ नगरकरांवर आलेली आहे.