दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून गरिबाच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचे पाच लाख कोटींचे कर्ज माफ अशा शब्दात मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. केंद्र सरकारने पेन्शन सुविधा बंद करण्यासाठी अग्निविर योजनेची सुरुवात केली असून 8 वा वेतन आयोग आणण्यास देखील मनाई केली आहे. मनरेगासाठी केंद्र सरकारकडे पैसे नाहीत असे देखील केंद्र सरकारने सांगितले आहे असे देखील अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेले आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की , ‘ पहिल्यांदा तांदूळ आणि गव्हावर टॅक्स लावण्यात आला. याआधी देखील कुठल्याच सरकारने इतके क्रूर पाऊल उचलले नव्हते. केंद्र सरकारची अशी काय अवस्था झाली की त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ आली. सरकारी शाळेत जर फी घेतली गेली तर अर्ध्याहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित राहून निरक्षर राहतील. गरीब माणसं शिक्षणासाठी आणि उपचारासाठी पैसे कुठून आणणार ? केंद्र सरकारचा हा पैसा जातो तरी कुठे ? केंद्राने आपल्या सरकारी पैशाने आपल्या मित्रांची कोट्यावधी रुपयांची कर्जे माफ केली. जर ही कर्जे माफ केली नसती तर देशाची अशी अवस्था झाली नसती.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून दिली असून सध्या राजदसोबत सत्ता स्थापन केलेली आहे. भाजपच्या अहंकारामुळे त्यांचे मित्रपक्ष त्यांना सोडून जात आहेत असे सांगत त्यांनी रावणच्या अहंकाराचे देखील उदाहरण दिलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत . केंद्र सरकार प्रचंड अहंकारी होत आहे आणि त्यांच्या या अहंकारामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.