‘ स्कूल चले हम जीएसटी के साथ ‘, छगन भुजबळ यांचा केंद्रावर हल्लाबोल

शेअर करा

केंद्र सरकारने छोट्या छोट्या गोष्टीवर देखील आता जीएसटी लावणे सुरू केलेले असून सर्वत्र महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली पहायला मिळत आहे. शैक्षणिक वस्तूंवर देखील सरकारने जीएसटी लावल्यानंतर गोरगरिबांना शिक्षण घेणे आणखीनच महाग होत असून सरकारची इच्छाच नक्की काय आहे हे स्पष्ट होत नाही. कमीत कमी अन्नधान्य, शालेय साहित्य आणि हॉस्पिटल बिल यांच्यावर जीएसटी लावू नये अशी अपेक्षा व्यक्त करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ‘ स्कूल चले हम जीएसटी के साथ ‘ अशी टीका केलेली आहे.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह आता खाद्यपदार्थांवर देखील जीएसटी कर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अन्नधान्य आणि काही जीवनावश्यक वस्तू आतापर्यंत करमुक्त होत्या मात्र त्यावर देखील आता व्याज आकारण्यात येत आहे. जीएसटी परिषदेच्या नवीन निर्णयामुळे पॅकिंग अन्नधान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ यावर देखील पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे याचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकरी वितरक आणि व्यापारी यांना बसणार आहे.

दही, तृणधान्य आणि तांदूळ यासारख्या वस्तू वर पाच टक्के जीएसटीचा फटका सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे. शिक्षणाशी संबंधित गोष्टीदेखील महाग होत असल्याने गोरगरीब नागरिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा देखील धोका आहे. कोणत्याही देशात आत्तापर्यंत शालेय वस्तूंवर कर लावलेला नसेल मात्र भारतात हा कर आता सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी सरकारने ‘ स्कूल चले हम ‘ एक जाहिरात काढली होती त्यावर आता ‘ स्कूल चले हम जीएसटी के साथ ‘ असे म्हणावे लागेल अशी टीका केली आहे .


शेअर करा