अभिषेक पुन्हा माझ्यावर प्रेम करेल का ? उच्चभ्रू तरुणीने काळ्या जादूचा घेतला सहारा अन..

शेअर करा

प्रेम आंधळं असतं असं अनेकदा आपण ऐकतो मात्र प्रेमात पडलेला व्यक्ती कधी काय करेल याचा काही नेम राहिलेला नाही अर्थात त्याचा गैरफायदा घेण्यासाठी देखील समाजात अनेक लोक टपलेले असतात. अशीच एक घटना मुंबई येथे समोर आली असून आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरुणी त्याला विसरू शकत नव्हती म्हणून तिने चक्क मॅजिक पॉवर असलेला एक बाबा सोशल मीडियावर शोधला आणि आणि त्यानंतर तो आपल्याला आपल्या प्रियकरापर्यंत घेऊन जाईल अशी तिची धारणा होती मात्र प्रत्यक्षात त्याने तिचा गैरफायदा घेत तिची सुमारे 8 लाख 95 हजार रुपयांना फसवणूक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, खानसाहेब असे या मॅजिक पावरवाल्या बाबाचे नाव असून तरुणीच्या प्रियकराचे नाव अभिषेक असे असल्याचे समजते. सदर तरुणी ही मुंबई येथील रहिवासी असून तिचा प्रियकर हा नांदेडचा रहिवासी आहे. आपल्या प्रियकराने आपल्यावर पूर्वीसारखेच प्रेम करावे अशी काहीतरी जादु करावी असे तरुणीने या बाबाला सांगितले होते. त्यानंतर त्याने तरुणीचा प्रियकर असलेला अभिषेक याचा फोटो आणि 50 हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर तरुणीने त्याचा फोटो आणि पन्नास हजार रुपये या बाबाला देऊन टाकले.

काही कालावधी गेल्यानंतर काहीच काम होत नाही हे तरूणीच्या लक्षात आल्यावर तिने खान साहेबाकडे पाठपुरावा सुरू केला त्यावेळी त्याने आपला माणूस मयत झालेला आहे. आणखीन एक लाख रुपये जर तू दिले तर अभिषेक पुन्हा तुझ्यावर प्रेम करायला लागेल अशी जादू मी करेल असे सांगत पुन्हा तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. सतत अशी वेगवेगळी कारणे पुढे करत त्याने आत्तापर्यंत तरुणीकडून आठ लाख 95 हजार रुपये लुबाडले आहेत. इतके सगळे करून देखील आपला प्रियकर अभिषेक हा अद्यापही आपल्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यावर तरुणीने त्याला पैसे मागण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने आपला मोबाईल स्वीच ऑफ करून टाकला .

अखेर या तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत चर्चा करून खारघर पोलीस ठाण्यात आरोपी खाँसाहेब याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर तरुणी ही उच्चशिक्षित असून एका आयटी कंपनीत काम करते. प्रेम पुन्हा कसे मिळवावे यासाठी तिने गुगल फेसबुक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माहिती सर्च केली आणि याच दरम्यान काळी जादू करणारा खाँसाहेब याच्या मोबाईल नंबरवर तिने संपर्क केला आणि त्यानंतर पुन्हा अभिषेक माझ्यावर प्रेम करेल का ? अशा स्वरूपाची विचारणा केली असता खाँसाहेब याने तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली. पोलीस सध्या या खान साहेबाचा शोध घेत आहेत.


शेअर करा