2 लाख रुपये द्या, उपोषण मागे घेतो…अन्यथा ॲट्रॉसिटीस तयार रहा : कुठे घडला प्रकार ?

  • by

उपोषण मागे घेण्यासाठी खंडणी म्हणून पैसे मागणे आणि ऍट्रॉसिटीची धमकी दिल्याप्रकरणी पुणे येथील देहू रोड परिसरातील एका आंदोलकांविरुद्ध देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात करण्यात आला आहे. अमित माणिक छाजेड असं आरोपीचं नाव असून पोलीस तपास सुरु आहे . मोबाईल रेकॉर्डिंगमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. याआधी देखील पुण्यात एका नगरसेवीकेच्या पतीस वॉर्डात विकासकामे करण्यासाठी याच पद्धतीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता .

उपलब्ध माहितीनुसार, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डानं या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून देखील पुढे काहीच कारवाई करत नसल्याने सदर बांधकामावर तात्काळ कारवाई करावी, यासाठी अमित माणिक छाजेड याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विरोधात उपोषणास सुरुवात केली.

अमित माणिक छाजेड उपोषणास सुरुवात केल्यानंतर काही तडजोड होऊन प्रकरण मिटते का ? या प्रयत्नात तो होता. अमित छाजेड याने देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनय बरोटा यांना फोन करून 17 व्यापाऱ्यांनी मिळून मला दोन लाख रुपये द्या. मी माझे आंदोलन उपोषण स्थगित करतो. अन्यथा माझ्या आंदोलनामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डकडून होणाऱ्या अतिक्रमण कारवाईला सामोरे जा आणि माझी मागणी पूर्ण झाली नाही तर व्यापाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हे दाखल करतो, अशी धमकी देखील दिली.

देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनय बरोटा यांनी अमित यांचे संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करून इतर व्यापाऱ्यांसोबत थेट पोलिस स्टेशन गाठलं. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अमित माणिक छाजेड याच्याविरुद्ध भादंवि कलम 385 अंतर्गत खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून देहूरोड पोलीस घटनेचा तपास करीत आहे.