… जर करोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर दिसला तर त्याला ..? : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खवळले

शेअर करा

कोल्हापूर सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा मुकाबला कसा करायचा यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढले असून त्यात कोरोना संदर्भात बेजबाबदार वागणार्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे . हॉस्पिटल, घरात अथवा हॉटेलमधून उपचार घेणारा करोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर दिसला तर त्याला तुरुंगात पाठवा, स्वॅबचा रिपोर्ट येईपर्यंत संबंधितांना घरातच राहण्याची सक्ती करा आणि मास्क न वापरणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड करा, असे देखील त्यांनी म्हटले आहे .

पत्रकात ते पुढे म्हणतात, काहीतरी लक्षणे असली किंवा करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळेच स्वॅब घेतला जातो. त्याचा अहवाल येण्यास एक ते दोन दिवसांचा अवधी जातो. मात्र माणसे स्वॅब देऊन सर्वत्र फिरत असतात. अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर किती तरी लोकांपर्यंत ते संसर्ग पसरवतात. याबाबत त्यांना जराही भान नसते. प्रशासनाने त्यांना अहवाल येईपर्यंत घरीच राहण्याची सक्ती केली पाहिजे. शिक्का मारून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाची वसुली केली पाहिजे. तसेच पॉझिटिव्ह असलेले रुग्णही घरी वेगळी रुम आहे किंवा खासगी दवाखान्यांत व हॉटेलमध्ये उपचार करण्याची परवानगी घेऊन बाहेर फिरत असल्याचे लक्षात आले आहे. अशा लोकांना सक्तीने तुरुंगात पाठवले पाहिजे.

मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे की, मास्क वापरत नाहीत त्यांच्यासाठी ५ हजार रुपये दंड केला पाहिजे. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी याबाबत पुढाकार घेऊन पोलिसी खाक्या दाखवला पाहिजे. ई -पास सवलत, लॉकडाऊन व इतर प्रक्रिया बंद झाल्यामुळे पोलिसांनी या कामामध्ये आता लक्ष घालावे. प्रशासनाने कोणाचीही फिकीर न करता या गोष्टी करोना संसर्ग कमी करण्यासाठी केल्याच पाहिजेत.

अनेक लोकांना न्यूमोनिया झाल्याचे सांगितले जाते. त्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह येते. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह म्हणून ते बाहेर फिरतच राहतात व इतरांना बाधित करतात. तज्ञांच्या मते ते करोनाग्रस्तच असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यावर उपचार झाले पाहिजेत व अशा न्यूमोनियाग्रस्त व्यक्तीने दवाखान्यांमध्ये किंवा घरीच उपचार घेतले पाहिजेत व दहा दिवस विलगीकरण केले पाहिजे. यामुळेसुद्धा प्रादुर्भाव वाढत आहे, असे मुश्रीफ यांनी पुढे नमूद केले.


शेअर करा